Nigdi : निगडीतील राष्ट्रध्वज आठ महिने फडकणार; पावसाळ्यात मात्र फडकणार नाही

एमपीसी न्यूज – देशाच्या राष्ट्रध्वजाविषयी असलेले प्रेम नव्या पिढीच्या मनात कायम रुजत राहावे, या हेतूने महापालिकेने निगडीतील भक्ती-शक्ती चौकात सर्वाधिक उंचीच्या राष्ट्रध्वजाची उभारणी केली. त्यानंतर मात्र बहुतांश वेळा हा राष्ट्रध्वज काढून ठेवण्यात येत असल्याचे दिसून येत होते. जोरदार वारा आल्यास धागे निघतात व त्यानंतर ध्वज फाटतो. त्यामुळे ध्वज खाली उतरावा लागतो. त्यासाठी राष्ट्रध्वजाचा अवमान होवू नये म्हणून पावसाळ्यातील चार महिने वगळून आठ महिने हा राष्ट्रध्वज फडकता ठेवण्यात येणार आहे. तसेच नवीन 12 राष्ट्रध्वजाची खरेदी करण्यात येणार आहे.

याबाबतची माहिती सभागृह नेते एकनाथ पवार यांनी दिली. पिंपरी-चिंचवड महापालिकेने भक्ती-शक्ती शिल्पसमूह उद्यान परिसरात सुमारे 107 मीटर उंचीचा खांब उभारुन त्याठिकाणी राष्ट्रध्वज फडकाविला होता. 26 जानेवारी 2018 रोजी प्रजासत्ताकदिनी राष्ट्रध्वजाचे अनावरन करण्यात आले. मात्र, राष्ट्रध्वजाची उंची सर्वाधिक असल्याने वा-याच्या वेगाने झेंड्याचे कापड फाटू लागले होते. त्यामुळे महापालिकेकडून राष्ट्रध्वजाचा अवमान होवू नये, याकरिता तो खाली उतरविला होता.

याबाबत महापालिका प्रशासनाने वाघा बॉर्डरवरील झेंड्याबाबत माहिती मागविली. तसेच तेथील राष्ट्रवध्जाच्या कापडाची माहिती घेवून त्याच दर्जाचा राष्ट्रध्वजाच्या खरेदीविषयी निविदा प्रक्रिया राबविण्यात येत आहे. 60 बाय 90 फुटांचा राष्ट्रध्वज मागविला आहे. त्यांच्या निविदा प्रक्रियेचे काम सुरु आहे. त्यानूसार 12 राष्ट्रध्वजाची खरेदी करण्यात येणार आहे, असल्याचे पवार यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.