National Hockey Championship 2021 : 11वी हॉकी इंडिया वरिष्ठ गट पुरुष राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा पिंपरी-चिंचवड 2021

एमपीसी न्यूज – टोकियो ऑलिंपिक स्पर्धेतील ब्रॉंझपदकाच्या कामगिरीनंतर प्रथमच देशातील स्टार खेळाडूंचा खेळ पाहण्याची संधी पिंपरी-चिंचवडकरांना मिळणार आहे. हॉकी इंडियाच्या 11व्या वरिष्ठ गटाच्या पुरुष हॉकी स्पर्धेचे आयोजन पिंपरी-चिंचवड येथे करण्यात येणार आहे. ही स्पर्धा 11 डिसेंबरपासून सुरू होईल.

स्पर्धेत हॉकी इंडियाशी संलग्न असलेल्या 30 राज्य संघटनांच्या संघाचा सहभाग असेल. स्पर्धेतील सर्व सामने नेहरुनगर पिंपरी येथील मेजर ध्यानचंद मैदानावर पार पडतील. दहा दिवस चालणाऱ्या या स्पर्धेचे आयोजन हॉकी महाराष्ट्राने केले असून पिंपरी – चिंचवड महापालिका आणि पिंपरी – चिंचवड पोलिस सह-आयोजक असतील. स्पर्धेचा अंतिम सामना 21 डिसेंबर रोजी होईल.

या वेळी राष्ट्रीय स्पर्धा नव्या पद्धतीने घेण्याचा निर्णय हॉकी इंडियाने घेतला असून, केवळ राज्य संघटनांचेच संघ स्पर्धेत सहभागी होतील. यापूर्वी संलग्न असणाऱ्या संस्थानाही राष्ट्रीय स्पर्धेत सहभाग मिळत होता. त्यामुळ स्पर्धा एकत्र व्हायची आणि त्यानंतर स्पर्धा दोन टप्प्यात (विभाग अ आणि विभाग ब) घेण्याचा निर्णय घेण्यात आला.

हॉकी महाराष्ट्राचे सहयोगी उपाध्यक्ष आणि संयोजन समितीचे कार्याध्यक्ष कृष्णा प्रकाश (आयपीएस) म्हणाले, गेली अनेक वर्षे अनेकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविणाऱ्या खेळाचा मला एक भाग होता आले आणि छोटीशी जबाबदारी सांभाळायला मिळाली हा मी माझा गौरव मानतो. एक खेळाडू म्हणून हॉकी महाराष्ट्राने माझ्यावर जी जबाबदारी दिल्यामुळे मला मोकळ्या मनाने भारतातील सुवर्णकाळ मानल्या जाणाऱ्या हॉकी खेळाशी जोडता आले.

ज्या प्रमाणे माझे संपुर्ण पोलिस दल सदैव माझ्या पाठिशी उभे रहाते, त्याप्रमाणे पिंपरी – चिंचवड महानगरपालिकेने तातडीने आम्हाला सहकार्य करण्याचे निश्चित केल्यामुळे मी हॉकी महाराष्ट्राच्या वतीने त्यांचे आभार मानतो. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आमच्याबरोबर असलेल्या सर्व सहयोगी भागीदारींनाही या वेळी विसरता येणार नाही. त्यांच्या पाठिंब्यामुळेच आम्हाला हे आव्हान पेलता आले. या स्पर्धेला सर्वोत्तम बनवणे हे आमचे उद्दिष्ट आहे. यासाठी सामने पाहायला चाहत्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे मी आवाहन करतो, असे पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश यावेळी म्हणाले.

या स्पर्धेसाठी पिंपरी-चिंचवड महापालिकने सर्व सर्वोत्तम सुविधांनी सज्ज हॉकी स्टेडियम उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शविली.

दरम्यान, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त आणि संयोजन समितीचे आधारस्तंभ राजेश पाटिल (आयएएस) म्हणाले,  आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधीत्व करताना देशाची मान कायमच उंचावणारे अनेक स्टार खेळाडू या खेळाने आपल्याला दिले; अशा सर्वोत्तम खेळाच्या स्पर्धेचे आयोजन करायला मिळणे हे आमचे भाग्यच आहे. शहरात हॉकीला प्रोत्साहन देताना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने नेहमीच मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियमला सर्वोत्तम सुविधा पुरवताना मागे पुढे पाहिले नाही.

जेव्हा आमच्याकडे या राष्ट्रीय स्पर्धेच्या आयोजनचा प्रस्ताव आला, तेव्हा आम्ही खेळाला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टिने तातडीने मंजुरी दिली. अलिकडेच आम्ही या मैदानाचे नूतनीकरण केले असून, तेथे अत्यधुनिक दर्जाचे ब्ल्यु टर्फ बसवले असून, आंतरराष्ट्रीय निकषांनुसार सर्व सुविधा येथे उपलब्ध करून दिल्या आहेत. आगामी काळात येथील जागतिक दर्जाच्या सुविधा विकसित करण्याचा आमचा मानस आहे आणि आम्ही त्यापद्धतीने कामही सुरू केले आहे, असे आयुक्त पाटील पुढे म्हणाले.

हॉकी महाराष्ट्र दहाव्यांदा राष्ट्रीय हॉकी स्पर्धेचे आयोजन करत आहे. या आतापर्यंतच्या आयोजनात तिसऱ्यांदा हॉकी महाराष्ट्र वरिष्ठ गटाच्या राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन करत आहे. यापूर्वी पुण्यात 2013 मध्ये तिसऱ्या आणि 2015 मध्ये पाचव्या राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

हॉकी महाराष्ट्राचे उपाध्यक्ष मनीष आनंद म्हणाले, राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा घेण्यासाठी हॉकी महाराष्ट्राने नेहमीच पुढाकार घेतला आहे. हॉकीवर भरभरून प्रेम करणारे चाहते असल्यामुळे आम्हाला अशा स्पर्धेचे आयोजन करण्याची प्रेरणा मिळते.’

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.