Moshi News : मोशी येथील मनोज गुंजाळ याला ‘राष्ट्रीय सेवा योजना पुरस्कार’, राष्ट्रपतींच्या हस्ते वितरण

एमपीसी न्यूज – मोशी येथील मनोज गुंजाळ याला विविध उपक्रमात महत्वपूर्ण योगदानासाठी ‘राष्ट्रीय सेवा योजना’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याशिवाय अकोला येथील सपना बाबर हिला देखील हा पुरस्कार देण्यात आला. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते दूरदृष्य प्रणालीद्वारे पुरस्काराचे वितरण करण्यात आले.

मनोज गुंजाळ यांनी जलसंरक्षण, हरितगाव, अवयवदान, प्रोढ साक्षरता, उज्ज्वला योजना, रक्तदान, वृक्षारोपण आदि कार्यक्रम व उपक्रमात सक्रिय सहभाग घेत महत्वपूर्ण योगदान दिले आहे. आपत्ती व्यवस्थापन विषयक हिवाळी अधिवेशनाच्या आयोजनातही मनोज मुंजाळने महत्वपूर्ण सहभाग नोंदविला होता.

मनोज आकुर्डी येथील प्रा. रामकृष्ण मोरे कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे. मनोज कला शाखेच्या शेवटच्या वर्षात शिक्षण घेत असून समाजसेवेची आवड आहे. वेगवेगळ्या आपत्कालीन, नैसर्गिक आपत्ती आणि कोरोना काळात देखील मनोजने उत्कृष्ट काम केले आहे. असे महाविद्यालयाच्या वतीने सांगण्यात आले.

तसेच, सपना बाबर अकोला येथील एलआरटी वाणिज्य महाविद्यालयाची विद्यार्थिनी आहे. सपना बाबर यांनी सॉफ्ट स्किल डेव्हलपमेंट, तंबाखुमुक्त अभियान आणि रस्ता सुरक्षा जागरूकता या कार्यक्रमांमध्ये जनतेचा सक्रिय सहभाग वाढविण्यासाठी उल्लेखनीय कार्य केले. झोपडपट्टीतील जनतेला विविध जनोपयोगी उपक्रमात सहभाग घेण्यासाठी प्रोत्साहित केले तसेच एड्स जागरुकता रॅली मध्ये सक्रिय सहभाग नोंदविला आहे.

केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा मंत्रालय यांच्यावतीने राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिनानिमित्त ‘राष्ट्रीय सेवा योजना’ पुरस्कार 2019-20 चे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमास राष्ट्रपती भवनातून राष्ट्रपती तर सुषमा स्वराज भवनातून युवक कल्याण व क्रीडा मंत्री अनुरागसिंह ठाकूर, राज्यमंत्री निसिथ प्रामाणिक, युवक कल्याण विभागाच्या सचिव उषा शर्मा आणि क्रीडा विभागाचे सचिव रवि मित्तल उपस्थित होते. देशाच्या विविध भागातील राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम समन्वयक, कार्यक्रम अधिकारी आणि विद्यार्थ्यांना उल्लेखनीय योगदानासाठी तीन श्रेणींमध्ये गौरविण्यात आले. यावेळी एकूण 42 पुरस्कार प्रदान करण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.