एमपीसी न्यूज – हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांची आज जयंती. देशातील दिग्गज खेळाडू ध्यानचंद यांचा जन्मदिवस राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. केंद्रीय क्रीडा मंत्री किरण रिजिजू यांनी ध्यानचंद यांना श्रद्धांजली वाहिली. 29 ऑगस्ट या राष्ट्रीय खेळ दिनी क्रीडा जगतात लक्षवेधी कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा सन्मान देखील करण्यात येतो.

आजच्या दिवशीच सन 1905 मध्ये भारताचे महान हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांचा जन्म झाला होता. देशातील सर्व खेळाडूंना प्रेरणास्थान ठरणाऱया या महान हॉकीपटूचा जन्म दिवशी क्रीडामंत्री किरण रिजिजू यांनी दिल्लीतील मेजर ध्यानचंद स्टेडियमवर जाऊन मेजर ध्यानचंद यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांनी देखील मेजर ध्यानचंद यांना अभिवादन केले आहे.

सचिन तेंडुलकर, विरेंद्र सेहवाग, शिखर धवन, व्हिव्हिएस लक्ष्मण, हार्दिक पांड्या, रोहित शर्मा यांनी मेजर ध्यानचंद यांना श्रद्धांजली वाहत सर्वांना राष्ट्रीय क्रिडा दिवसांच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद

ध्यानचंद यांचा जन्म अलहाबाद येथे 29 ऑगस्ट 1905 साली राजपुत घराण्यात झाला. खरंतर सैन्यात भरती झाल्यानंतर ध्यानचंद यांनी हॉकी खेळायला सुरूवात केली होती.

त्याआधी त्यांना हॉकीचा अनुभव नव्हता. त्यानंतर ध्यानचंद यांचा भाऊ रूप सिंग यानेही आपल्या ध्यानचंद यांच्या पावलावर पाऊल ठेवत हॉकीमध्ये आवड निर्माण केली.

मेजर ध्यानचंद यांचे खरे नाव ध्यान सिंग असे होते. मात्र, ते नेहमी रात्री चंद्र प्रकाशात सराव करत असत त्यामुळे कालांतराने त्यांच्या जवळच्या मित्रांनी ध्यान सिंग यांच्या नावापुढे ‘चंद’ हा शब्द जोडला. तेव्हापासून ध्यानचंद या नावाने ते ओळखले गेले.

हॉकी फेडरेशन आर्थिक संकटांना सामोरे जात असतानाही कोणताही दबाव निर्माण न होऊ देता ध्यानचंद यांनी भारतीय संघाचे नेतृत्त्व करून देशाला पहिले ऑलिम्पिक पदक जिंकून दिले होते.

त्यानंतर सलग दोन ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघाचा दबदबा कायम होता. ध्यानचंद यांच्या खेळाने सर्वांची मने जिंकली होती.

जर्मनीचा हुकमशहा हिलटरलाही ध्यानचंद यांच्या खेळाची भुरळ पडली होती. हिटलरने ध्यानचंद यांच्यासमोर जर्मनीचे नागरिकत्व आणि सैन्यातील सर्वोच्च पदवी देण्याचा प्रस्ताव ठेवला होता. मात्र, ध्यानचंद यांनी आपल्याला भारतासाठीच खेळायचे असल्याचे सांगत तो फेटाळून लावला होता.