National Youth Day : ग्रामीण भागातील सर्वसामान्य युवक आंतरराष्ट्रीय युवा राजदूत होतो तेव्हा

एमपीसी न्यूज – स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त 12 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय युवा दिवस (National Youth Day) म्हणून साजरा केला जातो. युवक म्हणजे देशाचे भविष्य असून त्यांच्या कलागुण आणि कौशल्यावर देश प्रगतीची शिखरे पार करणार आहे. राष्ट्रीय युवा दिवसानिमित्त महाराष्ट्रातील एका युवकाचा प्रेरणादायी प्रवास आपण पाहणार आहोत.

हा युवक ग्रामीण भागातून हलाखीच्या परिस्थितीशी संघर्ष करत शहरात आला. त्याने शिक्षण घेतले. नोकरी करता करता त्याने सामाजिक कार्यात देखील स्वतःला झोकून दिले आणि त्यातूनच पुढे एक दिवस तोच तरुण आंतरराष्ट्रीय युवा राजदूतही झाला.

वैभव दिलीपराव घुगे राहणार काळेवाडी, पिंपरी चिंचवड, मुळ गाव उडी, तालुका मालेगाव, जिल्हा वाशिम महाराष्ट्र. वडील डॉ दिलीपराव घुगे व्यवसायाने डॉक्टर व शेतकरी पण सामाजिक जान असल्यामुळे मिळेल त्यामध्ये समाधानी. त्यामुळे त्यांनी त्यांच्या आयुष्यात चांगली माणसे कमवली होती. त्यांचे विचार आणि समाजहिताची कामे आज ते नसतानाही लोकांच्या मनात घर करुन बसलेले आहेत. त्यांचाच वारसा घेऊन वैभव यांनी आयुष्याच्या प्रवासाची सुरुवात अंगणवाडी, जिल्हा परिषद शाळेतून केली. पुढे ते अभियांत्रिकी (Mechanical Engineering) व व्यवसाय व्यवस्थापन (MBA) या शाखेचे त्यांनी शिक्षण घेतले. शैक्षणिक क्षेत्रामध्ये अत्यंत खडतर परिस्थितीत स्वताला प्रत्येक वळणावर सिद्ध करत पुढे घेऊन जाणारा त्यांचा प्रवास खडतर होता.

अत्यंत दुर्गम परिस्थितीत शिक्षण पूर्ण करत व वडिल डॉ. दिलीपराव घुगे यांच्या सामाजिक विचारांनी प्रेरित होऊन त्यांना सामाजिक क्षेत्राची आवड निर्माण झाली. वयाच्या 17 व्या वर्षी अभंग, शिक्षण, क्रीडा व बहुउद्देशीय संस्था (NGO) 2006 मध्ये स्थापन करून त्या माध्यमातून ग्रामीण भागातील गरीब व अशिक्षित महिलांसाठी तसेच लहान मुलांसाठी त्यांनी काम सुरु केले. त्यांनतर गावामधील विविध उपक्रमध्ये सहभागी होऊन ते चांगल्या पद्धतीने कसे राबवले जातील यामध्ये हातभार लावणे, शेतक-यांना, मित्रांना RTI कायद्यांचे मार्गदर्शन करणे व त्यांना मदत करून त्यांचे प्रश्न मार्गी लावणे, ग्रंथालय चालू करून लहान मुलापासून ते ज्येष्ठांपर्यंत वाचता येतील अशी पुस्तके उपलब्ध करून देणे अशा विविध गोष्टींमध्ये तन-मन-धनाने मदत करून जमेल तेवढे समाजाशी निगडित प्रश्न सोडविणे, रक्त दान शिबिर, आरोग्य तपासणी शिबिर, भ्रष्टाचाराला आळा घालने, शासनाने जाहीर केलेली मदत त्या कुटुंबांना मिळण्यासाठी मार्गदर्शन करणे, रखडलेली शासकीय कामे मार्गी लावणे व नागरिकांच्या समस्या सोडविण्याकडे त्यांनी मोर्चा वळवला.

वैभव घुगे यांनी महाराष्ट्रातील विविध ग्रामीण भागामध्ये शाळेतील मुलांना मार्गदर्शन करून त्यांच्यामध्ये शिक्षणाची आवड निर्माण केली. पर्यावरण संवर्धनाबाबत प्रबोधन, अशिक्षित महिलांना आरोग्य, गरोदर काळात घ्यावयाची काळजी तसेच नवजात शिशुची काळजी, आहार, मासिक पाळी यांसारख्या विषयांवर त्यांचे काम उल्लेखनीय आहे. यासोबतच जिल्हा परिषदेच्या शाळेतील मुलांना संगणक वापरण्याबद्दल माहिती देणे, मुलांसाठी स्किल डेव्हलपमेंट प्रोग्रॅम घेणे, शासकीय योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी शेतक-यांना नेहमी मार्गदर्शन करणे, असे त्यांचे काम सुरु असते.

वैभव घुगे यांच्या मते “सध्याच्या मोबाईल आणि इंटरनेटच्या युगात शहरे प्रगतीची शिखरे पार करीत आहेत. त्याच वेळी गावगाडा मागे राहत आहे. ग्रामीण भागात व्यवसायाच्या संधी निर्माण करणे व युवा पिढीला योग्य ते मार्गदर्शन करून उद्योग उभारणीस मदत करणे. त्यासाठी आपण सर्वांनी ग्रामविकासाकडे धाव घ्यायला हवी. शहरे स्मार्ट होत आहेत पण गावाचा विकास खूप कमी आहे. त्यामुळे शहर विकासाबरोबर ग्रामविकासाच्या मुद्यावर भर देणे गरजेचे आहे.”

अभियांत्रिकी शिक्षणासाठी पुण्याला आल्यानंतर तेथेही आपल्या अभ्यासासोबत सामाजिक कार्याची चुणूक त्यांनी दाखवून दिली. त्यामध्ये कॉलेजमधील सीनिअरची अरेरावी व रॅगिंग, कॉलेजची फी वाढ, हॉस्टेल वरील समस्या असो किंवा डिपॉझिट फी (ठेव रक्कम) परत करण्याबाबत असो अश्या प्रत्येक समस्येवर अभ्यास करून कोणाच्याही अरेराविला बळी न पडता विद्यार्थ्यांच्या हिताचे निर्णय घेण्यासाठी नेहमी पुढे राहणारा विद्यार्थी म्हणून त्यांनी ओळख निर्माण केली. पुणे विद्यापठातील चुकीच्या पद्धतीने चालणारे काम निदर्शनास आणून विद्यार्थ्यांवर होणा-या अन्यायाबाबत जाब विचारणे, 5.5 कोटीचा पुणे विद्यापीठाचा निष्काळजीपणा अथवा घोटाळा अश्या अनेक समस्यांना वाचा फोडणे.

शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरीसोबतच समाजातील विविध विषयांवर काम करण्याची आवड असल्यामुळे विविध सामाजिक संस्थांशी वैभवचा परिचय झाला व त्या माध्यमातून पिंपरी चिंचवड शहरातील सामाजिक कार्यास सुरुवात झाली. यामध्ये पिंपरी चिंचवड सिटिझन फोरम, पर्यावरण संवर्धन समिती, निसर्गराजा मित्र जीवांचे, इम्प्रूव्ह माय सिटी, निसर्गमित्र, काळेवाडी रेसिडेंट वेलफेअर असोसिएशन अशा विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून कामाला सुरुवात केली. यामध्ये पिंपरी चिंचवड सिटिझन फोरम मध्ये एक सदस्य ते प्रभाग प्रमुख व नंतर समन्वयक ते मुख्य समन्वयक (अध्यक्ष) असा प्रवास खूप मेहनतीचा व सामजिक कामाच्या माध्यमातून लोकांच्या मनात घर करणारा होता. कोणतेही काम एकनिष्ठ राहून करणे यामुळे अनेकांच्या मनात वैभवने विश्वास निर्माण केला. त्यातून त्याला एक एक संधी व जबाबदारी मिळत गेली. वैभवने देखील एकनिष्ठ मनाने प्रत्येक संधीचे सोने करत सामाजिक कार्याची तळमळ दाखऊन दिली.

शैक्षणिक काळानंतर नोकरी व व्यावसायिक क्षेत्रामध्ये पण अत्यंत कठीण परिस्थितीत कमी पगारावर लघु उद्योग क्षेत्रामध्ये 2012 मध्ये कामाला सुरुवात करून कमी वयामध्ये एका बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये व्यवस्थापक अशी स्वतःची व्यावसायिक क्षेत्रामध्ये वेगळी ओळख निर्माण केली. या क्षेत्रामध्ये सुद्धा चांगल्या कामासाठी स्टार पुरस्कार, उत्कृष्ट कामगिरी बद्दल विशेष पुरस्कार त्याला मिळाले आहेत.

राष्ट्रीय ग्राममित्र युवा पुरस्कार हा भारत सरकार व राष्ट्रीय संस्था युथ फॉर डेव्हलपमेंट यांच्या माध्यमातून राबवण्यात आलेल्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामीण विकास, पंचायती राज व खनीजकर्म मंत्री नरेंद्र सिंह तोमर, केंद्रीय युवा व खेळ, तसेच माहिती व प्रसारण राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) ऑलंपिक पदक विजेते कर्नल राजवर्धन सिंघ राठोड, डॉ. प्रकाश बाबा आमटे, परळी या संकल्पनेचे जनक माननीय मयंक गांधी, ऑलंपिक पदक विजेते कुस्तीपट्टू योगेश्वर दत्त, युथ फॉर डेव्हलपमेंट संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रफुल्ल निकम, लोकसभा सदस्य डॉ. अनिल जैन, पोपटराव पवार यांच्या उपस्थितीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दिल्लीतील विज्ञान भवनात 16 जुलै 2018 रोजी प्रदान करण्यात आला. या पुरस्कारासाठी संपूर्ण भारतामधून तीन लाख युवांमधुन फक्त पंधरा युवा राष्ट्रीय पुरस्कार विजेत्यांची निवड करण्यात आली होती. या पुरस्काराबद्दल पंतप्रधान कार्यालयाचे संचालक डॉ. श्रीकर परदेशी यांनीही वैभव घुगे यांचे कौतुक केले.

नवभारत टाइम्सतर्फे सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनिय कार्याबद्दल वैभव घुगे यांचा ‘पिल्लर्स ऑफ न्यू इंडिया’ पुरस्काराने गौरव करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मानव आणि संसाधन विकास राज्यमंत्री डॉ. सत्यपाल सिंह यांच्या प्रमुख उपस्थित या पुरस्काराचे वितरण झाले. मुंबई मधील हॉटेल ट्रायडेन्ट मध्ये 11 फेब्रुवारी 2018 रोजी या पुरस्काराचे वितरण झाले. याप्रसंगी महिला व बालकल्याण राज्यमंत्री विद्या ठाकुर, भाजपचे मुंबई अध्यक्ष व आमदार आशिष शेलार, भोसरीचे आमदार महेश लांडगे, विधानपरिषदेचे आमदार प्रसाद लाड, प्रवीण दरेकर, वॉयफोरडीचे अध्यक्ष प्रफुल्ल निकम, महाराष्ट्राचे मुख्य सचिव सुमित मलिक, डेक्कन वॉटरचे सीएमडी अनिरबन सरकार, नवभारतचे मुख्य निमिष माहेश्वरी उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘न्यू इंडिया’ अभियानाने प्रेरित होऊन ‘पिल्लर्स ऑफ न्यू इंडिया’ या पुरस्काराच्या माध्यमातून युवकांसाठी देशातील सर्वात मोठा ‘प्लॅटफॉर्म’ नवभारत टाइम्स यांनी आयोजित केला होता. यामध्ये महाराष्ट्रातील 6 हजार 600 युवकांनी सहभाग घेतला होता. त्यापैंकी 10 वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणा-या प्रत्येकी 5 अश्या 50 युवकांचीरण्यात आली. यामध्ये क्रांतिकारी या क्षेत्रामध्ये यांची निवड करण्यात आली होती.

इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस् तर्फे इंडिया स्टार प्राउड पुरस्कार, महाराष्ट्र वंजारी महासंघ तर्फे राज्यस्तरीय साहित्यिक पुरस्कार यासोबतच वृक्ष लागवड-संवर्धन व जनजागृती पुरस्कार, निसर्गमित्र पुरस्कार, अभियांत्रिकी कॉलेजचा अभिमान पुरस्कार, समाजभूषण पुरस्कार, पर्यावरण कामानिमित्त पिंपरी चिंचवड महानगर पालिकेच्या वतीने मिळालेला विशेष सन्मान, इम्प्रूव्ह माय सिटी संस्थेला मिळालेले राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील विशेष पुरस्कार आणि यासोबतच समाजातील विविध माध्यमातून विशेष सन्मान व कौतुक हे नेहमीच विशेष प्रेरणादायी व पुढील कार्यासाठी ऊर्जा देणारे होते.

नाम फाऊंडेशन सोबत करण्याचा एक अविस्मरणीय अनुभव

नाम फाऊंडेशनसाठी पिंपरी चिंचवड शहरामधून पाच दिवसांमध्ये चेक स्वरूपात 1.29 कोटी रुपये निधी गोळा करून नाम फाऊंडेशनचे मकरंद अनासपुरे यांच्याकडे सोपवला. नाम फाऊंडेशनच्या माध्यमातून दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांसाठी अन्नधान्य वाटप कार्यक्रम राबवण्यात आला त्यावेळी वैभव वर मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्यातील म्हैस गव्हाण या गावाची जबाबदारी दिली गेली व त्यामध्ये 30 टन धान्याचे वाटप करण्याची जबाबदारी देण्यात आली आणि ती त्याने उत्तम पणे पार पडली.

15 ऑगस्ट 2017 रोजी जिल्हा परिषद शाळा गोदुंब्रे येथे झेंडा वंदन कार्यक्रमासाठी वैभवला आमंत्रित करण्यात आले होते व त्यांच्या हातून झेंडावंदन करण्यात आले होते. 15 ऑगस्ट 2018 रोजी पार्वती महाविद्यालय काळेवाडी येथे झेंडा वंदन कार्यक्रमासाठी आमंत्रित करून सन्मान करण्यात आला होता. हे दोन्ही दिवस वैभव साठी खुप मोठे व अविस्मरणीय असल्याचे तो सांगतो.

कोरोना काळात नागरिकांमध्ये जनजागृती करून आपणच आपली काळजी घेऊन स्वतः ला, आपल्या परिवाराला व आपल्या गावाला कोरोणा काळात कसे वाचवू शकतो यासंदर्भात माहिती देऊन गावातील नागरिकांना जागृत करणे, बाहेरील जिल्ह्यामध्ये अडकलेल्या व त्यांच्या गावातून बाहेर जाणाऱ्या नागरिकांच्या आरोग्य तपासणी करून त्यांना ई पास काढून देणे, गावात आलेल्या नागरिकांना अलगिकरण करून त्यांच्या आरोग्याची वेळोवेळी तपासणी करून घेणे व भारतीय नौदलाशी संबंधित एका क्षेत्रात तो सध्या काम करत असून ती जबाबदारी देखील तो उत्तमरीत्या पार पाडत आहे.

त्यांच्या गावातील आणि पिंपरी-चिंचवड शहरातील अनेक मान्यवरांनीं व नातेवाईकांनी त्याच्या कामासाठी सातत्याने प्रेरणा दिली आहे. यामध्ये प्रामुख्याने धनंजय शेडबाळे, राजीव भावसार, तुषार शिंदे, हृषिकेश तपशाळकर, प्रवीण अहिर, माणिक धर्माधिकारी, संदीप सपकाळ, दिक्षा घुगे, लक्ष्मीकांत घुगे, अतुल भेंडेकर, नितीन घुगे, अरूनाबाई कायंदे यासारखे अनेक जण खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभे असल्यामुळे हा प्रवास संघर्षातून विश्व निर्माण करणारा व आयुष्याच्या वेगवेगळ्या वळणावर, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण करून इतरांसाठी मार्गदर्शक व प्रेणादायी युवा असा प्रवास हा इतरांसाठी दिशा दाखवणारा ठरू शकतो.

वेगवेगळ्या विषयांवर काम करत वैभवने स्वतःची सामाजिक ओळख निर्माण केली. त्याचा हा प्रवास एक सामान्य ग्रामीण भागातील युवा पासून सुरू होऊन तो थेट राष्ट्रीय युवा पुरस्कार विजेता व आंतरराष्ट्रीय युवा संस्थेमध्ये आंतरराष्ट्रीय युवा राजदुत होण्यापर्यंत पोहचला.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.