Bhosari News : राष्ट्रवादीतर्फे बुधवारी भोसरीत जश्ने ईद-ए-मिलन; शरद पवार यांची प्रमुख उपस्थिती

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने राष्ट्रीय एकात्मता स्नेह मेळावा जश्ने ईद-ए-मिलन कार्यक्रमाचे येत्या बुधवारी (दि.11) भोसरीत आयोजन करण्यात आले आहे. माजी केंद्रीय कृषीमंत्री, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडणार आहे, याबाबतची माहिती राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी आज (सोमवारी) पत्रकार परिषदेत दिली.

निगडीत झालेल्या पत्रकार परिषदेला महिला अध्यक्षा कविता आल्हाट, युवक अध्यक्ष इम्रान शेख, माजी महापौर संजोग वाघेरे, मंगला कदम, माजी नगरसेवक भाऊसाहेब भोईर, नाना काटे, पंकज भालेकर, विनोद नढे, माजी नगरसेविका शमिम पठाण, कार्याध्यक्ष फजल शेख, युवती अध्यक्षा वर्षा जगताप आदी उपस्थित होते.

भोसरी, लांडेवाडीतील राजमाता जिजाऊ कॉलेजमध्ये बुधवारी (दि.11) सायंकाळी सहा वाजता हा कार्यक्रम होणार आहे. शिरूरचे खासदार डॉ.अमोल कोल्हे, पिंपरी विधानसभेचे आमदार आण्णा बनसोडे, भोसरीचे माजी आमदार विलास लांडे, माजी महापौर आझमभाई पानसरे तसेच पिंपरी-चिंचवड शहरातील पक्षाचे सर्व माजी महापौर, माजी नगरसेवक, नगरसेविका, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.

अजित गव्हाणे म्हणाले, हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन, बौध्द धर्मातील – पिंपरी-चिंचवड शहरातील प्रमुख धर्मगुरूंना या कार्यक्रमासाठी निमंत्रित करण्यात येणार आहे. सध्या केंद्रातील भाजपा सरकार हे राज्यातील ज्या पक्षाचे राजकिय अस्तित्व संपत आलेले आहे, अशा राजकीय पक्षाला पुढे करून महाराष्ट्र राज्यात जातीय तेढ निर्माण करण्याचे काम चालू आहे तसेच प्रक्षोभक भाषणे करुन हिंदू-मुस्लिम या मधील दरी निर्माण करण्याचे काम करताना दिसत आहे. समाजात अशांतता निर्माण होऊन समाजामध्ये भीतीदायक वातावरण तयार करण्याचे काम भाजपाच्या वतीने चालू आहे. केंद्रातील भाजप सरकार अतिशय खालच्या स्तरावरचे राजकारण करुन सत्तेचा दुरुपयोग केला जात आहे. स्वत:चे राजकिय स्वार्थ साधण्यासाठी भाजप काम करत असल्याचे सर्व सामान्य जनतेला दिसत आहे.

धर्माच्या नावाखाली राजकारण करणाऱ्यांना जनता जागा दाखवल्या शिवाय राहणार नाही

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकर यांच्या पुरोगामी महाराष्ट्र राज्यातील सुज्ञ जनता अशा चुकीच्या गोष्टीला कदापी खतपाणी घालणार नाही. जातीयवादी पक्ष व धर्माच्या नावाखाली राजकारण करणाऱ्यांना जनता आगामी काळात त्यांची जागा दाखवल्या शिवाय राहणार नाही.

शरद पवार यांनी त्यांच्या 55 वर्षांच्या सामाजिक व राजकिय जीवनामध्ये काम करीत असताना आपल्या देशातील सर्वसामान्य नागरीक यांना केंद्रबिंदू मानून काम केलेले आहे. आपल्या देशात विविध जाती-धर्म, पंथांचे लोक गुण्या गोविंदाने राहतात. सर्वधर्म समभाव व राष्ट्रीय एकात्मतेचा प्रसार व प्रचार समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोविण्यासाठी राष्ट्रीय एकात्मता स्नेह मेळावा जश्ने ईद-ए-मिलन” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे, असे गव्हाणे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.