Pimpri : सर्व सहकारी बँकांचे राष्ट्रीयीकरण करा; मोरवाडी ज्येष्ठ नागरिक संघाची केंद्रीय अर्थमंत्र्यांकडे मागणी

एमपीसी न्यूज – देशभरातील सर्व सहकारी बँकांचे राष्ट्रीयीकरण करावे. ज्यामुळे सहकारी बँकांच्या खातेदारांना त्यांचे पैसे मिळण्याची खात्री वाटेल. खातेदार नागरिकांना त्यांच्या पैशांची सुरक्षा वाटेल. तसेच सहकारी बँकांचे बळकटीकरण होऊन त्याचा देशहितासाठी फायदा होईल, अशी मागणी मोरवाडी ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांंच्याकडे केली आहे. 

ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, देशभरातील सहकारी बँका डबघाईला आल्या आहेत. राजकीय इच्छाशक्तीचा वावर सहकारी बँकांच्या क्षेत्रात झाला असल्याने त्यावर नियंत्रण राहिलेले नाही. मागील 10 वर्षात देशभरातील सुमारे 500 सहकारी बँकांना टाळे लागले आहे. यामुळे या बँकांच्या खातेदारांना मोठा तोटा सहन करावा लागला आहे.

_PDL_ART_BTF

निवेदनात पुढे म्हटले आहे की, सहकारी बँकांचे खातेदार सर्वसामान्य नागरिक आहेत. अनेक वर्ष काबाडकष्ट करून एक-एक रुपया साठवून त्यांनी ठराविक रक्कम जमा केलेली असते. अचानक बँकांना टाळे लागल्याने अशा सर्व खातेदारांवर मोठे संकट कोसळते. काही खातेदारांनी या तणावातून मुक्त होण्यासाठी आत्महत्येचा पर्याय अवलंबिला आहे. पीएमसी बँकेचे अगदी अलीकडचे उदाहरण आहे. पीएमसी बँकेच्या देशभरात 137 शाखा असून 11 हजार कोटी रुपयांच्या ठेवी या बँकेत आहेत. ही सहकारी बँक डबघाईला आल्याने लाखो खातेदार रस्त्यावर आले आहेत. हक्काचे पैसे असूनही त्यांना ते मिळत नाहीत.

बहुतांश ज्येष्ठ नागरिक सहकारी बँकांमध्ये ठेवलेल्या ठेवींवर येणा-या व्याजावर आपले जीवन यापन करीत असतात. ठेवींवर येणारे व्याजच त्यांच्या वृद्धापकाळाचा आधार असते. सहकारी बँकांच्या परिस्थितीबाबत एचडीएफसी बँकेचे चेअरमन दीपक पारेख यांनी देखील नाराजी व्यक्त केली आहे. या बँकांवर नियंत्रण ठेवणा-या सर्व वरिष्ठ संस्था निष्क्रिय ठरल्या आहेत. ठेवींचा दुरुपयोग करून मर्जीतील लोकांना कर्जवाटप करण्यात आले. एकाच व्यक्ती आणि संस्थेला अनेक वेळा कर्ज दिले गेले. अशा अनेक कारणांमुळे सहकारी बँका डबघाईला आल्या आहेत, असेही निवेदनात म्हटले आहे.

सहकारी बँकांना उर्जितावस्था देण्यासाठी त्यांचे राष्ट्रियीकरण करणे आवश्यक आहे. 1956 साली विमा कंपन्यांचे ज्याप्रमाणे राष्ट्रीयीकरण झाले, त्याचप्रमाणे सहकारी बँकांचे देखील राष्ट्रीयीकरण करायला हवे. यामुळे सर्व ठेवीदारांना दिलासा मिळेल. नागरिकांच्या ठेवींचा उपयोग देशहिताच्या कामासाठी करता येईल, अशी माहिती संघाचे अध्यक्ष बी आर माडगूळकर, कार्यवाह वाय आर आपटे यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.