Kamshet : नेवाळेसाहेब, राजकारणातून संन्यासाचा विचारही मनात आणू नका – देवा गायकवाड

एमपीसी न्यूज – ग्रामीण मावळातील कार्यकर्त्यांचे आधारस्तंभ असणाऱ्या बाळासाहेब नेवाळे यांची मावळ तालुक्याला गरज आहे. त्यामुळे त्यांनी राजकारणातून संन्यास घेण्याचा विचारही मनात आणू नये, असे कळकळीचे आवाहन कामशेत येथील युवा नेते देवा गायकवाड यांनी केले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी जाहीर सभेत टीका केल्यानंतर नेवाळे यांनी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व पुणे जिल्हा उत्पादक संघाचा राजीनामा दिला व मावळच्या सक्रिय राजकारणाला कायमचा ‘रामराम’ करण्याचा पत्रकार परिषदेत जाहीर केला. त्याची तीव्र प्रतिक्रिया मावळच्या ग्रामीण भागात उमटली आहे.

त्या संदर्भात देवा गायकवाड यांनी एका पत्राद्वारे नेवाळे यांनी निर्णयाचा फेरविचार करावा, असे आवाहन केले आहे. माननीय बाळासाहेब नेवाळेजी, आपलं कार्य महान आहे. आपल्याला मानणारा मोठा वर्ग आहे. आपण आमच्या ग्रामीण भागासाठी एक आदर्श नेतृत्व आहात. तुमच्या या निर्णयाने आम्हा सर्व कार्यकर्त्यांवर हा मोठा अन्याय होईल. आपल्या मावळ भागाचे नेतृत्व करणारे, ग्रामीण भागाचे नेतृत्व करणारे तुम्ही आमचे आदर्श आहात. आम्हा सर्व तरुणांकडून आपणास विनंती आहे की, आपण कृपया राजकीय संन्यास घेण्याचा विचार देखील मनात आणू नका, असे गायकवाड यांनी पत्रात म्हटले आहे.

आजपर्यंत तुम्ही कधी स्वतःचा विचार केला नाही आणि यापुढेही करणार नाही, याची आम्हाला शाश्वती आहे आणि म्हणूनच आम्हा सर्वांचा तुमच्यावर विश्वास आहे. तुम्ही तुमच्यासाठी नाही तर या ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांसाठी नक्की फेरविचार करावा, असे आम्हा सर्व तरुणांकडून तुम्हाला विनंती आहे. कृपया आपण राजकीय संन्यास घेण्याविषयी विचार देखील करू नका आणि तसे जर झाले तर माझ्यासारखा कार्यकर्ता देखील राजकारण व समाजकारण सोडून देण्याचा विचार करील. आपण राजकारणात पुन्हा सक्रिय होऊन आपण मावळ तालुक्यासाठी काम करत राहावे. मावळ तालुक्याला आपली गरज आहे. ही माझ्यासारख्या तरुणाची कळकळीची विनंती आहे, असेही गायकवाड यांनी म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.