Talegaon Crime News : पोलिसांना चक्क ‘मामा’ बनवून नवरदेव परागंदा!

 एमपीसी न्यूज – फसवणूक व बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ नये यासाठी पोलीस ठाण्याच्या आवारातील मंदिरात ‘पोलीस मामां’च्या उपस्थितीत रात्री साडेअकराच्या ‘अजब’ मुहूर्तावर लग्न केलेला नवरदेव दुसऱ्याच दिवशी दुपारी त्याच्या कुटुंबासह परागंदा होण्याची तळेगाव दाभाडे येथे घडली आहे.त्यामुळे पळून गेलेल्या नवरदेवाला शोधण्याची नामुष्की ‘पोलीस मामां’वर ओढवली आहे.

 

श्रेयस श्रीराम पेंडसे (वय 29, रा. कडोलकर कॉलनी, तळेगाव दाभाडे) असे पळून जाणाऱ्या नवरदेवाचे नाव आहे.

 

यासंदर्भात वधूपित्याने पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांची भेट घेऊन लेखी तक्रार केली आहे.दोन दिवसात आरोपीला अटक न केल्यास नववधूच्या परिवारासह आपण पोलिस आयुक्त कार्यालयासमोर उपोषणास बसू, असा इशारा माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप नाईक यांनी दिला आहे.

 

तळेगाव दाभाडे येथे राहणाऱ्या एका तरुणीचे व श्रेयस याचे गेल्या आठ वर्षांपासून प्रेमसंबंध होते. गेले दोन महिने तो पीडित तरुणीला टाळत होता.दुसऱ्या मुलीबरोबर त्याने लग्न जुळवले होते. तो दारू पीत असल्याचे लक्षात आल्यानंतर दुसऱ्या मुलीने त्याला लग्नास नकार दिला.त्यानंतर पुन्हा तो पहिल्या तरुणीस दारू पिऊन त्रास देऊ लागला.संबंधित तरुणीने श्रेयस याने लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याची तक्रार तळेगाव पोलिसांकडे केली.

 

पोलिसांनी तत्परता दाखवत श्रेयस याला पाच ऑगस्टला ताब्यात घेतले. पीडित मुलीशी लग्न कर नाहीतर फसवणूक व बलात्काराचा गुन्हा दाखल करून खडी फोडायला पाठवू, असा पोलिसी खाक्यातला दम दिला. त्याला घाबरून श्रेयसने लग्न करण्यास होकार दिला.श्रेयसला सुधारण्याची एक संधी द्यावी म्हणून मुलीचे कुटुंबीय देखील लग्नाला तयार झाले.त्यानुसार पोलीस स्टेशनच्या आवारात असलेल्या दत्त मंदिरात त्याच रात्री साडेअकरा वाजता दोन्ही कुटुंबांतील सदस्य, पोलीस आणि ब्राह्मणाच्या उपस्थितीत छोटेखानी विवाह सोहळा पार पडला.

 

दुसऱ्या दिवशी दुपारी श्रेयस आपल्या नववधूला घेऊन सासुरवाडीला आला. घरात आई औषध घेऊन झोपली आहे. ती दार उघडत नाही, आपल्या पत्नीला येथेच थांबू देत.थोड्या वेळाने आपण तिला घेऊन जाऊ, असे सांगून श्रेयस निघून गेला. त्यानंतर तो व त्याचे कुटुंब दोघेही घर सोडून पसार झाल्याचे लक्षात आले. नववधूच्या कुटुंबाने व त्यांच्या मित्र परिवाराने श्रेयसला शोधण्याचा खूप प्रयत्न केला, मात्र 12 दिवस होऊन गेले तरी अद्याप त्यांचा थांगपत्ता लागू शकला नाही.

 

आरोपीवर गुन्हा दाखल करण्याऐवजी तडजोडीने लग्न लावून देण्याचा खटाटोप तळेगाव दाभाडे पोलिसांच्या चांगलाच अंगाशी आला आहे. पीडित मुलीच्या कुटुंबाने व माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप नाईक यांनी याप्रकरणी आक्रमक भूमिका घेतल्यामुळे पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. संपूर्ण मावळ तालुक्यात हा चर्चेचा विषय झाला आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.