Navlakh Umbre News : बधलवाडी शिवारात विजेच्या धक्क्याने तीन फ्लेमिंगोचा मृत्यू; एक गंभीर जखमी

एमपीसीन्यूज : नवलाख उंबरे हद्दीतील बधलवाडी शिवारात शनिवारी (दि.3) सकाळी तीन फ्लेमिंगो पक्षी मृतावस्थेत, तर एक गंभीर जखमी अवस्थेत आढळून आला. उच्च विद्युत वाहिनीच्या तारेचा धक्का बसून या पक्ष्यांचा मृत्यू झाला. मृतांपैकी दोन पक्षी मादी तर एक नर आहे.

यापूर्वी अशाच प्रकारचा अपघात नवलाख उंबरे हद्दीतील बधलवाडी शिवारात फेब्रुवारी महिन्यात झाला होता. त्यात सहा फ्लेमिंगो पक्ष्यांना जीव गमवावा लागला होता.याच परिसरात पुन्हा अशीच दुर्दैवी घटना घडल्याने पक्षी व प्राणी प्रेमींमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. जखमी फ्लेमिंगो पक्ष्याला पुढील उपचारासाठी पुणे (भूगाव) येथील रेस्कू चॅरिटेबल ट्रस्ट येथे दाखल केले आहे.

बधलवाडी येथील गबाजी नाथा दहातोंडे यांच्या शेतात हे तीनही पक्षी शनिवारी मृतावस्थेत आढळले. दहातोंडे यांना मध्यरात्री काही पक्ष्यांचे ओरडण्याचे आवाज ऐकू आले. त्यांनी पहाटे शेतात पाहणी केली असता त्यांना तीन पक्षी मृतावस्थेत तर एक गंभीर जखमी अवस्थेत दिसला. त्यांनी याबाबत वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे अध्यक्ष निलेश गराडे यांच्याशी
संपर्क साधला.

त्यावर गराडे यांनी वडगाव मावळचे वनपरिक्षेत्र अधिकारी सोमनाथ ताकवले यांच्याशी संपर्क साधून झालेल्या घटनेची माहिती दिली. यानंतर तातडीने घटनास्थळी वनरक्षक रेखा वाघमारे, वनसेवक दलू गावडे,कोंडीबा जांभूळकर उपस्थित झाले.

उच्च विद्युत वाहिनीचा धक्का बसल्याने तीनही पक्षी गंभीर जखमी होऊन मृत झाले. फ्लेमिंगो पक्षी स्थलांतरीत होत असताना अधिक संख्येने असतात. त्यामुळे उड्डाणादरम्यान त्यांचा उच्च दाबाच्या दोन तारांमध्ये संपर्क आला असावा. त्यामुळे हे तीनही पक्षी मृत्युमुखी पडले आहेत, अशी महिती निलेश गराडे यांनी दिली.

भिगवण येथील उजनी धरणातील पक्षी अनेकदा मुंबईच्या दिशेने स्थलांतरीत होत असतात. मावळ तालुक्यातील डोंगरी भागात मोठ्या पवन चक्क्या उभारण्यात आल्या आहेत. त्यामुळे फ्लेमिंगो पक्ष्यांनी आपले मार्ग बदलले असल्याने असे अपघात मावळ तालुक्यात घडत आहेत. यापूर्वीही सहा फ्लेमिंगो पक्ष्यांना आपला जीव गमवावा लागला असेही त्यांनी यावेळी सांगितले.

पशुधन अधिकारी डॉ. नितीन मगर, डॉ. बाळासाहेब वाघमोडे, भास्कर माळी यांनी मृत पक्ष्यांचे शविच्छेदन केले. त्यानंतर वडगाव मावळ येथील वन हद्दीत अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत विल्हेवाट लावण्यात आली.

फ्लेमिंगो या पक्ष्याला रोहित पक्षी म्हणून देखील ओळखले जाते. पाणथळ जागी थव्याने राहणारा, फिनिकोप्टेरस जातीतला हा पक्षी आहे. त्याची मान उंच व पाय लांब असतात. रोहिताची पिसे आणि चोच गुलाबी आणि काळ्या रंगाची असतात. फ्लेमिंगो पक्षी हे छोटे कवचधारी प्राणी, अळ्या,कीटकांचे पिलव, पाणवनस्पतींच्या बिया, सेंद्रिय गाळ, शैवाल खाऊन आपला उदरनिर्वाह करतात.

वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे निलेश गराडे, प्रथमेश मुंगणेकर, निनाद काकडे, विकी दौंडकर, जिगर सोलंकी यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.