Pune : लतादीदी-किशोरदांच्या गाण्यांनी बहरला नवरात्रौत्सव

एमपीसी न्यूज- भारतीय चित्रपट संगीताला आपल्या अवीट गोडीच्या गळयाने अजरामर गाण्यांची भेट देणारे महान पार्श्वगायक किशोर कुमार आणि गानसम्राज्ञी भरतरत्न लता मंगेशकर यांनी गायलेल्या गाण्यांच्या सादरीकरणाने पुणे नवरात्रौत्सव संगीतमय सूरांनी बहरला. पुणे नवरात्र महोत्सव समिती, फिनोलेक्स इंडस्ट्रीज आणि मुकुल माधव फौंडेशनतर्फे आयोजित २५ व्या पुणे नवरात्र महोत्सवात युवा गायक आणि कलाकारांनी जितेंद्र भुरुक प्रस्तुत ‘तुम आ गए हो’ हा कार्यक्रम सादर झाला.

लता मंगेशकर यांच्या ९० वाढदिवसानिमित्त आणि किशोर कुमार यांच्या ९० व्या जयंतीनिमित्त गायकांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. पोलीस अधिकारी प्रदीप देशपांडे, प्रकाश गायकवाड यांच्यासह महोत्सवाचे संयोजक आबा बागूल, जयश्री बागूल, घनःश्याम सावंत, नंदकुमार बानगुडे, नंदकुमार कोंढाळकर, रमेश भंडारी, अमित बागुल, विकी खन्ना यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

प्रसिद्ध गायक जितेंद्र भुरुक यांच्यासह रश्मी मुखर्जी यांनी किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांच्या द्वंद्व गीते गाऊन कार्यक्रमाला ‘चार चाँद’ लावले. नितीन शिंदे (तबला, जेंबे), किरण एकबोटे (ढोलक), दिनेश पांडे (साईड ऱ्हिदम), अभिजित भदे (ऑक्टोपॅड), बाबा खान (सॅक्सोफोन), निलेश देशपांडे (बासरी), विशाल थेलकर (गिटार), मिहिर भडकमकर (सिंथेसायझर), बिशाल रायकर (बेस गिटार) यांनी गायकांना अप्रतिम सुरेल साथसंगत केली.

रत्ना दहिवेलकर यांनी कार्यक्रमाचे निवेदन केले. ‘हम दोनो दो प्रेमी’, ‘आपकी आखो मे कुछ’, ‘तेरे चेहरे से’, ‘गुम है किसी के प्यार मे’, ‘शोखियो मे घोला जाए’, ‘तेरे बिना जिंदगी से कोई’ अशा अजरामर गीतांचा नजराना रसिकांसमोर पेश करत गायक आणि वादकांनी आपल्या अप्रतिम अदाकारीने कार्यक्रमात रंगत आणली. आबा बागुल यांनी स्वतः ‘सलामे इश्क’ हे गाणे गात उपस्थितांची मने जिंकली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.