Pune : पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक नयना गुंडे यांची बदली

एमपीसी न्यूज – ठाकरे सरकार सत्तेत आल्यानंतर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतील अधिकाऱ्यांची बदली होणार, अशी चर्चा अनेक दिवसांपासून होती. गुरुवारी अखेर या अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली. त्यामध्ये पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक नयना गुंडे यांची बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. व्ही. एन. सूर्यवंशी यांची शासनाने नियुक्ती केली आहे. त्यांच्या समोर ‘पीएमपीएमएल’च्या अनेक समस्या सोडविण्याचे आव्हान आहे. गुंडे यांच्याकडे पुण्यातील आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या आयुक्तपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

नयना गुंडे यांनी तुकाराम मुंढे यांच्या बदली नंतर दि. १२ फेब्रुवारी २०१८ रोजी पीएमपीच्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला होता. तत्कालीन अध्यक्ष तुकाराम मुंढे यांची केवळ दहा महिन्यांतच बदली करण्यात आली होती. त्यानंतर गुंडे यांच्याकडे पीएमपीची जबाबदारी आली. त्यांनाही केवळ १ वर्ष ११ महिन्यांचा कालावधी मिळाला. त्यांच्या कार्यकाळामध्ये पीएमपीच्या ताफ्यात १५० इलेक्ट्रीक बस, २०० मिडी बस तर सुमारे ४०० सीएनजी बस दाखल झाल्या. कंपनी स्थापन झाल्यापासून पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणावर पीएमपीला बस मिळाल्या आहेत. त्यांनी बस खरेदी व भाडेतत्वाची प्रक्रिया वेगाने पार पाडली. ‘पीएमपीएमएल’ला अध्यक्ष म्हणून आणखी काही वर्षे अनुभवी अधिकारी होता. मात्र, मुंढे पाठोपाठ गुंडे यांचीही लवकरच बदली झाली आहे.

नयना गुंडे यांनी महिलांसाठी तेजस्विनी बससेवा सुरू केली. महिलांसाठी ५० हून अधिक बस सुरू केल्या. मागील काही वर्षांपासून रेंगाळलेले आस्थापना आराखड्याचे कामही गुंडे यांनी सुरू केले. नुकतेच १४०० कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.