Chinchwad News : ‘एनसीबी’ने चार्जशीटमधून आर्यनला वगळले, समीर वानखेडे यांच्यावर कारवाई झाली पाहिजे – दिलीप वळसे-पाटील

एमपीसी न्यूज – अमली पदार्थ बाळगल्याच्या, त्याचे सेवन केल्याच्या प्रकरणात ‘एनसीबी’ने न्यायालयात दाखल केलेल्या 6 हजार पानांच्या आरोपपत्रात (चार्जशीट) आर्यन खानचा समावेश नाही, अशा चुकीच्या पद्धतीने एखाद्या निष्पाप व्यक्तीला अडकविण्याचा प्रयत्न जर कोणी केला. तर, त्याला शिक्षा झाली पाहिजे. एनसीबीचे तत्कालीन मुंबई प्रमुख समीर वानखेडे यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आज (शनिवारी) केली.

अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याच्यासह सहा जणांना ‘एनसीबी’ने सबळ पुराव्याअभावी शुक्रवारी निर्दोष सोडले. आर्यन खान याने अमली पदार्थ बाळगल्याचा वा त्याचे सेवन केल्याचा पुरावा नसल्याचे ‘एनसीबी’ने स्पष्ट केले. चिंचवड येथे एका खासगी कार्यक्रमासाठी आलेल्या गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले, ”आर्यन खान याच्यावर जे आरोप केले गेले होते. त्याच्यामध्ये काही तथ्य आढळले नाही. त्यामुळे चार्जशीटमधून आर्यन खानचे नाव वगळले आहे. मला अस वाटतं की केंद्राने सुद्धा याची दखल घेतलेली आहे आणि संबंधिताविरुद्ध कारवाईची सूचना दिलेली आहे. अशा चुकीच्या पद्धतीने एखाद्या निष्पाप व्यक्तीला अडकविण्याचा प्रयत्न जर कोणी केला. त्याला शिक्षा झाली पाहिजे. ती भूमिका आमची सुद्धा राहील”.

पूर्वाअनुभव पाहता एनसीबीचे तत्कालीन मुंबई प्रमुख समीर वानखेडे यांच्यावर कारवाई होईल असे वाटते का, याबाबत विचारले असता गृहमंत्री वळसे पाटील म्हणाले, ”मला असे वाटते की वानखेडे यांच्यावर कारवाई होईल. त्यांनी ज्या पद्धतीने हे प्रकरण हाताळले आहे. त्याबाबत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. राणा दाम्पत्यांचा आंतरराष्ट्रीय प्रश्न नाही. त्यामुळे त्याला एवढे महत्त्व द्यायची गरज नाही”, असेही ते म्हणाले.

बघू ‘त्या’ पत्रात काय आहे?

पिंपरी-चिंचवडचे तत्कालीन पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्यासाठी जमीन खरेदी विक्री प्रकरणी 200 कोटी पेक्षा अधिक रक्कम गोळा केल्याचा दावा एका व्हायरल पत्रातून करण्यात आला होता. हे पत्र सहायक पोलीस निरीक्षक अशोक डोंगरे यांनी लिहिल्याचे सांगितले जात होते. पण, त्यांनी पत्र लिहिले नसल्याचे सांगितले. हे व्हायरल पत्र तुमच्याकडे आले होते. त्याबाबत विचारले असता गृहमंत्री वळसे पाटील म्हणाले, ”बघू त्या पत्रात काय आहे. चौकशी पूर्ण झाल्यावर मग सांगतो, काय केले जाईल”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.