Pune-Pimpri-Chinchwad: राष्ट्रवादी आक्रमक; गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

ncp aggressive on controversial statement of gopichand padalkar on sharad pawar , jode maro protest in pune, pimpri-chinchwad सध्या भाजप व त्या विचारधारेतील मंडळींना सत्ता गेल्याने मानसिक रोगाने पछाडले आहे.

एमपीसी न्यूज- भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी अतिशय खालच्या पातळीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली. त्यांच्या या वक्तव्याच्या निषेधार्थ गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे मंडई येथे टिळक पुतळ्याजवळ पडळकर यांच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन करण्यात आले. यावेळी पडळकर यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहनही करण्यात आले. दरम्यान, पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनेही पिंपरी येथे आंदोलन करण्यात आले. पडळकर यांच्या छायाचित्राला काळे फासून त्याला जोडे मारण्यात आले.

पुण्यात पक्षाचे प्रवक्ते अंकुश काकडे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. पडळकर यांचा बोलविता धनी भाजप आहे. हा पक्ष दुतोंडी आहे. त्यामुळे पडळकर नव्हे तर भाजपने माफी मागावी, अशी मागणी करण्यात आली.

यावेळी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले होते. नेते जयदेव गायकवाड, स्वीकृत नगरसेवक सुभाष जगताप, माजी महापौर राजलक्ष्मी भोसले, माजी नगरसेवक रवींद्र माळवदकर, प्रदीप देशमुख, नगरसेवक बाबुराव चांदेरे, प्रकाश म्हस्के, महेश हांडे, राकेश कामठे यांच्यासह राष्ट्रवादीचे अनेक कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.

सध्या भाजप व त्या विचारधारेतील मंडळींना सत्ता गेल्याने मानसिक रोगाने पछाडले आहे. त्यामुळे शरद पवार यांच्यासारख्या उत्तुंग व्यक्तिमत्वावर ज्यांची बोलायची लायकी नाही, असे अनेक लोक गेले काही दिवस भ्रमिष्ट झाल्यासारखे बरळत आहेत. यातून ते लवकर बरे व्हावेत, अशा आमच्या त्यांना सदिच्छा आहेत.

सुसंस्कृत महाराष्ट्राला अशोभनीय अशा या वर्तणुकीचा व वक्तव्याचा आम्ही निषेध करतो, असे राज्यसभेच्या खासदार वंदना चव्हाण आणि आमदार चेतन तुपे यांनी म्हटले आहे.

तर, शरद पवार यांच्यासारख्या मोठ्या नेत्यावर टीका करण्याची पडळकर यांची लायकी नाही. बारामती विधानसभा मतदारसंघात डिपॉझिट जप्त करून जनतेने त्यांची जागा दाखवून दिली आहे.

_MPC_DIR_MPU_II

किमान आता तरी त्यांनी जपून आणि भान ठेवून बोलावे, अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पडळकरांना त्यांची जागा दाखविल्या शिवाय राहणार नाही, असा इशारा आमदार सुनील टिंगरे यांनी दिला.

पिंपरी-चिंचवड येथे कार्यकर्त्यांचा आक्रमक पवित्रा

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या बेताल वक्तव्याचे जाहीर माफी मागावी अन्यथा त्यांच्या तोंडाला काळं फासून चोप देऊ, असा इशारा पिपरी-चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसकडून दिला आहे. पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेस व युवक काँग्रेसच्या वतीने पिंपरी येथे पडळकर यांच्या पोस्टरला काळे फसत जोडे मारत आंदोलन केले.

यावेळी शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष रविकांत वर्पे, राष्ट्रवादी युवकचे अध्यक्ष विशाल वाकडकर, प्रदेश सरचिटणीस लाला चिंचवडे, राष्ट्रवादी काँग्रेस शहर उपाध्यक्ष संतोष वाघेरे, मयूर जाधव, प्रसाद कोलते, नाना वाकडकर, निखिल दळवी, शहर सरचिटणीस शिवराज रणवरे, नवनाथ वाळुंजकर, चेतन वाघमारे आदी कार्यकर्ते उपस्थित होते

यावेळी बोलताना वाघेरे म्हणाले की, शरद पवार यांच्याबद्दल असं बोलायची महाराष्ट्रातील विरोधकांची देखील हिंमत होत नाही. मात्र ही चुका पहिल्यांदाच मुख्यमंत्री बनलेल्या फडणवीस यांच्या डोक्यात सत्तेची हवा घुसली आणि केली.

त्यांनी पवार साहेबांचं राजकारण संपलं अस म्हटल्याचे प्रायचित्त मिळाले व त्यांना खुर्चीवरून खाली बसावे लागले. शरद पवाराचं राजकारण संपलं असा भाजपचा प्रचाराने महाराष्ट्रातील शेतकरी राजा, नवीन युवक व माता-भगिनींना रुचला नाही आणि नियतीने त्यांची खुर्चीच हिरावून घेतली.

त्यांनाही राजकारणातला बापमाणूस कोण याचा नुकताच साक्षात्कार झाला. तीच हवा नव्याने आमदार झालेल्या पडळकर यांच्या डोक्यात घुसली आहे का ? त्यांनी शरद पवारांवर टीका करताना स्वतःची उंची तपासावी. तसेच केलेल्या वक्तव्याचे जाहीर माफी मागावी अन्यथा त्यांना पिंपरी चिंचवड शहरात पाय ठेवू देणार नाही, असा इशारा वाघेरे यांनी दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.