Pimpri: इफ्तार व नमाज पठण घरातच करा; राष्ट्रवादीचे आवाहन

एमपीसी न्यूज – मुस्लिम बांधवांचा पवित्र महिना रमजान आज (शनिवार) पासून सुरु झाला आहे. परंतु, कोरोनाला रोखण्यासाठी भारतात लॉकडाऊन आहे. त्यामुळे या कालावधीत मुस्लिम बांधवांनी इफ्तार व नमाज पठण घरातच करावे, असे आवाहन पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसने केले आहे.

पक्षाचे  प्रवक्ते फजल शेख यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे  मुस्लिम बांधवांना घरी राहूनच रमजान साजरा करण्याचे आवाहन केले आहे. सध्या केवळ भारतातच नव्हे तर, संपूर्ण जगात कोरोना व्हायरसच्या महाभयंकर आजारामुळे परिस्थिती गंभीर झाली आहे. भारतात लॉकडाऊन सुरू आहे. अनेक भागात रूग्णांची संख्या अधिक असल्याने तो परिसर सील केला आहे. नागरिकांनी एकत्र न येता घरातच थांबण्याचे आवाहन प्रशासनाच्या मार्फत केले जात आहे.

त्यामुळे मुस्लिम समाजातील सर्व बांधवांनी  यंदाच्या वर्षीचा  रमाजनाचा पवित्र महिना घरात थांबूनच साजरा करावा. सकाळी सहेरिला अथवा सायंकाळी रोजा इफ्तारला मस्जिद मध्ये न जाता घरातच रोजा इफ्तार करावेत.  इफ्तार व नमाज पठण घरातच करावे. मस्जिदमध्ये किंवा घराच्या गच्चीवर (टेरेस) वर एकत्र येऊन अथवा ग्रुपने नमाज पठण करु नये.

या रमजान महिन्यात जकात-फितरा माध्यमातून गोरगरिबांना मदत करावी. गरजूंना अन्नधान्य, जेवणाची मदत करावी. हे सर्व करत असताना सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन शेख यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.