Pimpri News: भाजपच्या राजवटीत विकासकामांऐवजी भ्रष्टाचारामुळेच शहराची चर्चा; राष्ट्रवादीचा आरोप

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असताना शहराची विकासकामांमुळे चर्चा होत होती. मागील साडेचार वर्षांपासून भाजपच्या राजवटीत भ्रष्टारामुळे शहराची चर्चा होत आहे. सत्ताधा-यांनी शहर स्वच्छतेची वाट लावली, असा आरोप राष्ट्रवादीच्या पदाधिका-यांनी केला.

अपक्ष आघाडीचे गटनेते कैलास बारणे यांनी आज (गुरुवारी) राष्ट्रवादीत प्रवेश केला. शहराध्यक्ष संजोग वाघेरे, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, माजी महापौर योगेश बहल, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, संतोष बारणे, प्रवक्ते फजल शेख महापालिकेत आयोजित पत्रकार परिषदेला उपस्थित होते. ”भाजपचे राज्यातील नेते देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील त्यांच्या ताब्यात असलेल्या महापालिकेतील भ्रष्टाचाराबाबत गप्प का आहेत” असा सवाल शहराध्यक्ष वाघेरे यांनी यावेळी केला.

दरम्यान, ”भाजपच्या सत्तेत विकास कामांऐवजी भ्रष्टाचाराची चर्चा होत आहे. भाजपच्या काळात शहरातील स्वच्छतेची वाट लागली”, असा आरोप संतोष बारणे यांनी केला. कैलास बारणे म्हणाले, ”पवना जलवाहिनीचा प्रश्न मार्गी लागला पाहिजे अशी आमची मागणी आहे. मागच्या सत्तेतील पालकमंत्री कितीवेळा शहरात आले. त्यांनी किती प्रश्न सोडविले. भाजपचे नगरसेवक केवळ सोशल मीडियावर फोटो टाकतात. नारळ फोडतात. काम चालू असतानाच चौकशीची पत्रे देतात. विकासकासाठी त्यांनी कधी तरतूद केली का, अपक्ष नगरसेवक माझ्या संपर्कात आहेत. तेही हळूहळू येतील. सर्व अपक्ष नगरसेवक पाठीमागून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येणार आहेत”.

माजी महापौर योगेश बहल म्हणाले, स्थायी समिती अध्यक्षांच्या लाचप्रकरणातील अटकेच्या कारवाईतून भाजपच्या पारदर्शक, स्वच्छ कारभाराची प्रचिती आली आहे. महापालिकेची आगामी निवडणूक जवळ आली. निवडणुकीचा खर्च काढण्यासाठी भाजपने टक्केवारी दणक्यात वाढविली. स्थायी समिती अध्यक्षांना हे कोणी करण्यास सांगितले”, असा सवालही त्यांनी केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.