Maharashtra: शरद पवारांनी घेतली राज्यपालांची भेट

Ncp chief sharad pawar meets governor bhagatsingh koshyari in rajbhavan

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज (दि. 25) राजभवनवर जात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. ही सदिच्छा भेट होती असे जरी राष्ट्रवादीकडून सांगण्यात आले असले तरी राजकीय वर्तुळात मात्र अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

सोमवारी सकाळच्या सुमारास शरद पवार आणि माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी अचानक राजभवनावर जात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. भेटीनंतर माध्यमांशी बोलताना प्रफुल्ल पटेल यांनी ही सदिच्छा भेट होती असे सांगितले. भगतसिंह कोश्यारी हे राज्यपाल झाल्यापासून त्यांची भेट झाली नव्हती. यापूर्वीच ते भेटणार होते. परंतु, लॉकडाऊनमुळे ते भेटू शकले नव्हते. म्हणून आज ते भेटल्याचे पटेल म्हणाले.

या भेटीबाबत कोणतेही राजकीय निष्कर्ष काढण्याची गरज नाही. भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. सरकारमध्ये हस्तक्षेप करण्याची पवारांची इच्छा नसते, असे पटेल यांनी स्पष्ट केले. राज्यपालांनी निमंत्रण दिले होते. यावेळी शरद पवार यांनी कुठल्याच विषयावर चर्चा केली नाही, याचा पुनरुच्चार त्यांनी केला.


दरम्यान, राज्य सरकार आणि राज्यपाल यांच्यात अनेकवेळा संघर्षाचे प्रसंग घडले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आमदारकीचा विषय असो किंवा सध्याचा तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याबाबत उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी घेतलेली भूमिका. यावरुन राजभवन आणि राज्य सरकारमध्ये मतभेद दिसून आले.

शिवसेना नेते तथा राज्यसभा सदस्य संजय राऊत यांनीही दोन दिवसांपूर्वी राज्यपाल कोश्यारी यांची भेट घेतली होती. नेहमी राज्यापालांवर टीकास्त्र सोडणाऱ्या राऊत यांनी राज्यपाल कोश्यारी यांचे कौतुक केले होते. दरम्यान, भाजपचे राज्यसभेतील खासदार नारायण राणे यांनी देखील राज्यपालांची भेट घेतली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.