Pimpri Municipal Election 2022: शरद पवार शनिवारी घेणार राष्ट्रवादीच्या आजी-माजी नगरसेवकांची बैठक, रविवारी मेळावा

एमपीसी न्यूज – आगामी पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी शहरात लक्ष घातले. येत्या शनिवारी आणि रविवारी पवार दोन दिवसांच्या शहर दौ-यावर येणार आहेत. शनिवारी आजी-माजी नगरसेवकांची बैठक तर रविवारी कार्यकर्ता मेळावा घेणार आहेत. याबाबतची माहिती राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी आज (गुरुवारी) पत्रकार परिषदेत दिली.

पिंपरीत झालेल्या पत्रकार परिषदेला आमदार अण्णा बनसोडे, माजी आमदार विलास लांडे, माजी महापौर आझम पानसरे, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, माजी महापौर मंगला कदम, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अजित गव्हाणे, प्रशांत शितोळे, जगदीश शेट्टी, प्रवक्ते फजल शेख उपस्थित होते.

वाघेरे म्हणाले, आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने पवार साहेब शनिवारी आणि रविवारी असे दोन दिवसांच्या शहर दौ-यावर येत आहेत. शनिवारी दुपारी साडेतीन वाजता आमदार अण्णा बनसोडे यांच्या कार्यालयात सरकारी योजनेचा नागरिकांना लाभ देण्याच्या उपक्रमाचे उद्घाटन करणार आहेत.

त्यानंतर निगडी, यमुनानगर येथील बॅक्वेट हॉल येथे आजी-माजी नगरसेवक, पदाधिका-यांची बैठक होणार आहे. तर, रविवारी दुपारी साडेतीन वाजता रहाटणीतील थोपटे लॉन्स येथे कार्यकर्ता मेळावा होणार आहे. पवारसाहेब कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत.

उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, खासदार डॉ. अमोल कोल्हे हे उपस्थित असणार आहेत. या मेळाव्यात विविध पक्षाचे पदाधिकारी राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत.

पवारसाहेबांच्या दौ-यामुळे कार्यकर्त्यांना उर्जा मिळेल. महापालिकेतील भाजपच्या भ्रष्टाचाराच्या तक्रारी पुराव्यानिशी केल्या आहेत. लवकरच त्याची चौकशी लागेल. भाजपच्या स्थायी समिती अध्यक्षांना लाचप्रकरणी एसीबीने अटक केली. भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांना भाजपची सत्ता असलेल्या पालिकेतील भ्रष्टाचार दिसत नाही का, असा सवाल वाघेरे यांनी केला.

विलास लांडे म्हणाले, ”शरद पवार, अजित पवार यांनी पिंपरी-चिंचवड शहराला पुढे नेले. मागील साडेचार वर्षात भाजपने भ्रष्टाचार करुन शहराच्या पवित्र भूमिला अपवित्र केले. पवारसाहेब भाजपचे दहन करायला शहरात येत आहेत. आगामी महापालिका निवडणुकीत जनतेच्या आर्शिवादाने राष्ट्रवादीची सत्ता येईल”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.