Sharad Pawar Melava Live Updates : रहाटणी येथील कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना शरद पवार म्हणाले…

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड महापालिका आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात राजकीय घडामोडींना सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पिंपरी चिंचवड शहरातील राजकीय परिस्थितीचा दोन दिवसांच्या दौऱ्यात आढावा घेतला. शनिवारी (दि. 16) शरद पवार यांनी राजकीय भेटीगाठी आणि कार्यक्रमानंतर पत्रकारांशी संवाद साधला. तर रविवारी (दि. 17) रहाटणी येथे प्रमुख उपस्थिती मेळावा घेतला. मेळाव्यातून त्यांनी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि पिंपरी चिंचवडकारांशी संवाद साधला.

मेळाव्यासाठी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, खासदार अमोल कोल्हे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, आमदार अण्णा बनसोडे, माजी आमदार विलास लांडे, माजी महापौर आझम पानसरे, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, महिला अध्यक्षा वैशाली काळभोर, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, माजी महापौर मंगला कदम, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अजित गव्हाणे, प्रशांत शितोळे, जगदीश शेट्टी, प्रवक्ते फजल शेख, विशाल वाकडकर आदी उपस्थित होते.

मेळाव्यात बोलताना शरद पवार नेमकं काय म्हणाले –

  • मागील काही दिवसांपूर्वी सोलापूरला भेट दिली आणि तिथल्या सर्व स्तरातील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. आता पिंपरी चिंचवड शहराचा दौरा, संपुर्ण महाराष्ट्रात शक्य तेवढ्या ठिकाणी जाण्याचा निर्धार केला व्यक्त
  • जगात किंमत वाढली म्हणून देशात इंधन वाढले हे कारण सांगितले जात आहे. पण जगात किंमत कमी झाली तरी देशातली इंधन दरवाढ वाढतच आहे. इंधनाच्या किमतीत 25 टक्के कमी केली तरी चालण्यासारखे आहे. याबाबत पी चिदंबरम यांनी लेख लिहिला आहे असे मत व्यक्त.
  • उद्योगनगरी विषयी सांगताना पवार यांनी टाटा कंपनी कशी आली ते सांगितले. उद्योगांचे विकेंद्रीकरण करताना पिंपरी – चिंचवड शहरात कारखाने काढण्याचा निर्णय घेण्यात आला. अनेकांनी मुंबई च्या वागळे इस्टेट मध्ये कारखाने सुरू केले. जमशेदजी टाटा यांनी त्यांचा कारखाना इतर राज्यात नेण्याचा विचार केला त्यावेळी यशवंतराव चव्हाण यांनी त्यांची भेट घेऊन टाटा कारखाना पिंपरी चिंचवड शहरात आणण्याची विनंती केली आणि टाटा कंपनी शहरात आली.
  • एच ए कंपनीचा इतिहास सांगताना पवार म्हणाले, पेनिसिलिनचे इंजेक्शन न मिळल्याने कस्तुरबा गांधी यांचे निधन झाले. त्यानंतर जवाहरलाल नेहरू यांनी तात्काळ निर्णय घेऊन पिंपरी येथे एच ए कंपनी सुरू केली.  दरम्यान, विरोधकांनी धारेवर धरताना पवार म्हणाले, कामगारांच्या हिताच्या विरोधात आताचे केंद्र सरकार आहे. त्यांना सत्तेवर बसण्याचा कोणताही अधिकार नाही. मी मुख्यमंत्री असताना अनेक कारखान्यांना शहराच्या आसपास जागा दिल्या. रांजणगाव, चाकण, भोसरी, इंदापूर या भागात अनेक उद्योग आहे. कारखानदारांना अनुकूल अशी नीती आताचे केंद्र सरकार घेत नाही.
  • कृषीप्रधान म्हणून गणल्या जाणाऱ्या देशाचे केंद्रीय कृषिमंत्री असताना आलेले कठीण प्रसंग आणि त्यावर केलेली मात याच्या पवार यांनी काही आठवणी सांगितल्या. पवार म्हणाले, देशात फक्त चार आठवडे पुरेल एवढाच अन्नसाठा आहे अशी त्यावेळी एक फाईल माझ्याकडे आली. त्यात अन्नधान्य अमेरिका, ब्राझील यांसारख्या देशातून आणण्याचे ठरले. पण मी त्या विरोधात होतो. मनमोहन सिंग यांनी आग्रह केल्याने मी त्या फाईलवर सही केली. पण त्यानंतर मी निर्धार केला आणि हे चित्र बदलण्याचा निर्धार केला.
  • आज भारत जगातील 18 देशांना निर्यात करतो. भारत पूर्वी तांदूळ आयात करत होता. आज भारत तांदूळ निर्यात करणारा जगातील प्रमुख देश आहे. साखरेच्या बाबतीत देखील हीच परिस्थिती आहे. पूर्वी घरातील कोणी आजारी असेल तरच फळे आणली जात. पण आता फळे मुबलक प्रमाणात आहेत. शेतकऱ्याने ठरवलं तर जगाच्या भुकेचा प्रश्न सहज सोडवू शकतो. भाजप सरकार शेतकऱ्यांकडे हिताच्या दृष्टीने पाहत नाही, असा घणाघात पवार यांनी केला.
  • हिंजवडी येथे कारखान्याच्या भुमीपूजनाला गेल्यावर करखान्यालाच मी विरोध केला आणि इथे आयटी पार्क येईल असे सांगितले. आज लाखो तरुण तरुणी आयटी क्षेत्रात पिंपरी चिंचवड शहरात काम करत आहे. सध्या केंद्र सरकार याबाबतीत योग्य पावलं उचलतील असं दिसत नाही.
  • सध्याच्या ईडी आणि इतर यंत्रणांच्या होणाऱ्या गैरवापराबद्दल पवार म्हणाले,  उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकार राज्यात काम करत आहे. मात्र केंद्र सरकारची राज्याला मदत होत नाही. जीएसटी ची राज्याची 30 हजार कोटींची रक्कम केंद्राकडे पडून आहे. महाराष्ट्राला एका बाजूने कमकुवत करण्याचा तर दुसऱ्या बाजूने ईडी आणि अन्य सर्व यंत्रणा वापरून त्रास दिला जात आहे.
  • ईडी छापांवर भाष्य करताना पवार पुढे म्हणाले, अनिल देशमुख यांच्यावर आरोप झाले. ज्या पोलिसाने आरोप केला त्याला काहीच आधार नव्हता. त्यानंतर अनिल देशमुख गायब झाल्याचे उठवले. देसाई, अशोक चव्हाण, भावना गवळी या सगळ्यांकडे ईडी लावली. पण यातून काहीच निष्पन्न होत नसल्याने केंद्राने आता अजित पवार आणि त्यांच्या कुटुंबियांना त्रास देण्याचे काम सुरू केले आहे, असे म्हणून केंद्र सरकारच्या या चुकीच्या धोरणांवर दुःख व्यक्त केले.
  • तुम्ही कितीही काहीही करा पण हे सरकार पाच वर्षे राहणारच . मी तुम्हाला खात्री देतो, केंद्र सरकारचे हे वागणे फार काळ राहणार नाही.
  • पिंपरी चिंचवड शहराचा चेहरा ज्यांनी बदलला त्यांच्या हाती आता सत्ता नाही. मात्र आता ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांनी लूट केली आहे. त्यांना खड्यासारखे बाजूला कराल, अशी खात्री पवार यांनी व्यक्त केली.

लवकरच महापालिका निवडणुकांचे बिगुल वाजणार आहे, त्यामुळे पिंपरी – चिंचवड महापालिकेत कोणाची सत्ता येणार अशी चर्चा चांगली रंगू लागली आहे. याच राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी घेतलेला हा मेळावा आगामी निवडणूकीत चित्र पालटणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.