Pimpri News : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शहराध्यक्ष बदलाच्या हालचाली; शहराध्यक्षपदासाठी ‘या’ नावांची चर्चा

एमपीसी न्यूज – आगामी पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी उलथापालथ होऊ घातली आहे. संजोग वाघेरे यांच्या शहराध्यक्षपदाच्या तीन वर्षांच्या दोन टर्म पूर्ण झाल्या आहेत. शहराध्यक्ष बदलाच्या जोरदार हालचाली सुरु झाल्याने राष्ट्रवादीत गटबाजीही उफाळू लागली. शहराध्यक्ष समर्थकांचा निवडणुकीच्या तोंडावर बदल करण्यास विरोध दिसून येतो. तर, दुसरा गट शहराध्यक्ष बदलाच्या बाजूने आहे. येत्या दोन दिवसात शहराध्यक्ष बदल होऊ शकतो अशी जोरदार चर्चा राष्ट्रवादीच्या गोटात सुरु आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार त्याबाबतचा निर्णय घेणार आहेत.

पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक फेब्रुवारी 2022 मध्ये होणे अपेक्षित आहे. प्रभाग रचनेचे काम अंतिम टप्प्यात आहे. डिसेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात प्रभाग रचना आणि आरक्षण सोडत जाहीर होऊ शकते. निवडणूक कामाला वेग येताच राजकीय घडामोडींनाही वेग आला आहे. महापालिकेत विरोधात असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने संघटनात्मक फेरबदल करण्याचे निश्चित केले आहे. संजोग वाघेरे एप्रिल 2015 मध्ये राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष झाले. त्यांच्या तीन वर्षाच्या दोन टर्म पूर्ण झाल्या आहेत.

आता निवडणुकीच्या तोंडावर पक्षाने संघटनात्मक बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षाने वाघेरे यांना राजीनामा देण्याचा आदेश दिल्याची जोरदार चर्चा सुरु आहे. त्यामुळे वाघेरे समर्थक अस्वस्थ झाले असून ‘WE SUPPORT SANJOG BHAU’ अशी मोहिम सुरु केली. त्यामुळे शहराध्यक्ष बदलावरुन राष्ट्रवादीत गटबाजी सुरु झाली असल्याचे दिसून येत आहे. शहराध्यक्ष बदल पुढील दोन ते तीन दिवसात होईल असे राष्ट्रवादीच्या एका गटातून सांगण्यात येत आहे.

दरम्यान, शहराध्यक्षपदासाठी माजी आमदार विलास लांडे, माजी महापौर योगेश बहल, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या नावाची चर्चा आहे. तर, युवक अध्यक्षपदासाठी माजी महापौर आझम पानसरे यांचे पुत्र निहाल पानसरे, महिला अध्यक्षपदासाठी माजी महापौर अपर्णा डोके, वैशाली घोडेकर आणि कविता आल्हाट यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे.

”पक्ष नेतृत्वाकडून अद्यापपर्यंत मला राजीनामा देण्याचा आदेश आला नाही. आदेश आल्यानंतर राजीनामा देईल”, असे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.