Pune : केरळमधील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी धावले पुण्यातील राष्ट्रवादीचे नगरसेवक

एमपीसी न्यूज – केरळमधील पाऊस आणि पुराने केरळमध्ये आतापर्यंत शेकडो बळी घेतले आहेत आणि कोट्यावधींचे नुकसान देखील झाले आहे. त्यामुळे या नैसर्गिक आपत्तीच्या संकटात सापडलेल्या केरळसाठी मदतीचा ओघ सुरूच आहे. पुण्यातील केरळवासीयांनी ओणम सण साजरा न करण्याचा निर्णय घेतला असून त्यातून जमा होणारी रक्कम केरळला मदत म्हणून पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. तर आता पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक सुद्धा केरळच्या मदतीला धावले आहेत.  

पुणे महानगरपालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व नगरसेवक एक महिन्यांचे मानधन केरळ पुरग्रस्तांच्या मदतीसाठी देणार आहेत. यासंबधीच्या निर्णयाची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष व महापालिकेतील विरोधी पक्षनेते चेतन तुपे यांनी दिली आहे.
महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे ४१ नगरसेवक आहेत. एका नगरसेवकाला २० हजार रुपयांचे मानधन मिळते. त्यानुसार गोळा होणारा ८ लाख २० हजारांचा निधी केरळ पुरग्रस्तांच्या मदतीसाठी दिला जाणार आहे. त्याचबरोबर पुरग्रस्तांना औषधोपचार व अन्य साहित्यांची गरज असल्याने शहर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून औषधोपचार व अन्य साहित्याची मदतही गोळा करून ती केरळला पाठविण्यात येणार असल्याचे तुपे यांनी सांगितले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.