Pimpri News: पुणे महानगर नियोजन समितीची निवडणूक! राष्ट्रवादीच्या अजित गव्हाणे यांच्यासह 8 नगरसेवक रिंगणात

एमपीसी न्यूज – पुणे महानगर नियोजन समितीच्या निवडणुकीसाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे भोसरीतील नगरसेवक अजित गव्हाणे यांच्यासह भाजपचे 7 अशा 8 नगरसेवकांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. या निवडणुकीसाठी पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेतील नगरसेवक, नगर परिषद, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे सदस्य तसेच सरपंच असे 978 मतदार मतदान करणार आहेत. पुणे आणि पिंपरी महापालिकेतून 22 उमेदवार निवडून द्यायचे आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसकडून भोसरीतील नगरसेवक अजित गव्हाणे यांनी अर्ज दाखल केला. गव्हाणे यांचा अर्ज दाखल करताना राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, नगरसेवक मयूर कलाटे, प्रवीण भालेकर, राजू बनसोडे, नगरसेविका संगीता ताम्हाणे, पोर्णिमा सोनवणे आदी उपस्थित होते. तर, सत्ताधारी भाजपकडून सभागृह नेते नामदेव ढाके, नगरसेवक चंद्रकांत नखाते, अभिषेक बारणे, वसंत बोराटे, संदीप कस्पटे, जयश्री गावडे, निर्मला गायकवाड यांनी अर्ज भरले आहेत.

उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस होता. अर्ज मागे घेण्याची मुदत 25 ऑक्टोबरला दुपारी तीन वाजेपर्यंत आहे. 10 नोव्हेंबरला मतदान आणि 12 नोव्हेंबरला निकाल जाहीर केला जाणार आहे. या सदस्यांना केवळ तीन महिन्याचा कालावधी मिळणार आहे. त्यामुळे निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे.

या निवडणुकीसाठी मोठे नागरी मतदार संघ (पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका), लहान नागरी मतदार संघ (नगर परिषदा) आणि ग्रामीण मतदार संघ (जिल्हा परिषद) यातील मतदार मतदान करणार आहेत. त्यानुसार मोठ्या नागरी मतदारसंघात पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांतील नगरसेवक आहेत. या मतदारांची संख्या 285 आहे. त्यात 137 नगरसेवक आणि 148 नगरसेविकांचा समावेश आहे.

लहान नागरी मतदारसंघात जिल्ह्यातील लोणावळा, तळेगाव, शिरूर, आळंदी, चाकण, राजगुरुनगर आणि सासवड नगरपरिषदांतील 114 सदस्य आहेत. त्यात 64 माहिला सदस्य आणि 50 पुरुष सदस्य आहेत. ग्रामीण मतदारसंघात जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समितीचे सभापती आणि सरपंच मतदार आहेत. त्यांची संख्या 579 आहे. त्यात 270 पुरुष मतदार, तर 309 महिला मतदार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.