Pune News : राष्ट्रवादी भाजपला विचारणार ‘क्या हुआ तेरा वादा’?

एमपीसी न्यूज – पुणेकरांना मोठमोठी स्वप्ने दाखवून प्रत्यक्षात गेल्या साडेचार वर्षात पायाभूत सुविधादेखील पुरवण्यास अपयशी ठरलेल्या भारतीय जनता पक्षाला आम्ही त्यांनी केलेल्या वायद्यांची आठवण म्हणून प्रश्न विचारणार आहोत. त्यासाठी आम्ही समाजमाध्यमांच्या माध्यमातून ‘क्या हुवा तेरा वादा’ ही प्रश्नमालिका सुरु करत असून या माध्यमातून भाजपच्या अपयशाचा पाढा वाचणार आहोत’, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिली.

भाजपच्या वायद्यांची आठवण करुन देणाऱ्या प्रश्नमालिकेविषयी माहिती देताना जगताप म्हणाले, ‘पुणे महापालिकेत पुणेकरांनी भाजपला ऐतिहासिक बहुमत दिले होते. मात्र या बहुमताचा वापर पुण्याच्या विकासासाठी करणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात मात्र भाजपचे वायदे म्हणजे ‘बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात…’ या म्हणीप्रमाणे ठरले आहेत. भाजपच्या या ‘मुंगिरीलाल’च्या स्वप्नांनी जाणीव पुणेकरांना करुन देणे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कर्तव्य आहे’.

‘पुणेकरांना २०१७ च्या महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने आश्वासनांची खैरात केली होती. मोफत बस सेवा, चकाचक आणि खड्डेमुक्त रस्ते, गतीमान प्रशासन अशी मोठी यादी भाजपने पुणेकरांसमोर वाचली होती. पुणेकरांनीही भाजपच्या पारड्यात मते टाकली, मात्र प्रत्यक्षात पुणेकरांचा भ्रमनिरास आणि विश्वासघात झाला. त्यामुळे पुणेकर या विश्वासघाताला आगामी निवडणुकीतून उत्तर देतील, हे स्पष्ट आहे’, असेही जगताप म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.