Pimpri : राष्ट्रवादीची विरोधी पक्ष म्हणून काम करण्याची मानसिकता नाही – एकनाथ पवार

एमपीसी न्यूज – भामा-आसखेड आणि आंद्रा धरणातील पाणी आरक्षणास मुदतवाढ मिळावी यासाठी भाजपने पाठपुरावा केला. त्यात यश आले असून पाणी आरक्षणास मंजुरी मिळाली. ही बाब राष्ट्रवादीच्या पदाधिका-यांना खटकत असल्याने त्यांच्याकडून बिनबुडाचे आरोप करण्यात येत आहेत, अशी टीका सभागृह नेते एकनाथ पवार यांनी केली. तसेच विरोधी पक्ष म्हणून काम करण्याची राष्ट्रवादीची मानसिकता नाही. त्या मानसिकतेतून ते बेछूट आणि निरर्थक बिनबुडाचे आरोप करीत आहेत, असेही ते म्हणाले.

पाणी आरक्षणाची मंजुरी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यकाळातीलच असून आता केवळ मुदतवाढ मिळाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या विकासकामांचे श्रेय घेत भाजपा पदाधिकारी ढोलकी वाजवित आहेत, असा आरोपी महापालिकेतील विरोधी पक्षनेता दत्ता साने केला होता. त्याला पवार यांनी आज प्रसिद्धीपत्रकाद्वारे प्रतित्त्यूर दिले आहे.

पवार म्हणाले, शहरातील पाणी टंचाईस राष्ट्रवादी काँग्रेस जबाबदार आहे. राष्ट्रवादीने त्यांच्या सत्ताकाळात पाणीपुरवठ्याबाबत योग्य नियोजन केले नाही. चोवीस तास पाणीपुरवठा योजनेचाही त्यांनी फज्जा उडविला. त्यामुळे शहरवासीयांना पाणी टंचाईला सामोरे जाण्याची वेळ आली आहे. यावर उपाययोजना म्हणून भाजपाने भामा-आसखेड आणि आंद्रा धरणातील पाणी आरक्षणासाठी पाठपुरावा केला. त्यात यश आले असून पाणी आरक्षणास मंजुरी मिळाली.

पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी पवना धरणातून 48.576 दशलक्ष घनमीटर, भामा-आसखेड धरणातून 60.79 दशलक्ष घनमीटर आणि आंद्रा धरणातून 38.87 दशलक्ष घनमीटर असा एकूण 148.236 दशलक्ष घनमीटर पाणी आरक्षणास शासनाच्या जलसंपदा विभागाने मंजुरी दिली. या आरक्षणास मंजुरी करून घेण्यासाठी पालकमंत्री गिरीश बापट यांच्या माध्यमातून भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार लक्ष्मण जगताप, आमदार महेश लांडगे यांनी पाठपुरावा केला. त्याला यश आले असून शहरासाठी पाणी आरक्षित झाले आहे.

तत्कालीन जलसंपदामंत्री अजित पवार यांनी त्यांच्या राजकीय स्वार्थासाठी पाण्याचे राजकारण केले. भामा-आसखेड आणि आंद्रा धरणातील पाणी आरक्षित करूनही त्यांनी पुर्नस्थापना रक्कम राष्ट्रवादीच्या तत्कालीन सत्ताधा-यांना भरू दिली नाही. महापालिका प्रशासनावर दबाव आणून संबंधित रक्कम अदा करण्याच्या कामात विलंब केला. परिणामी पाण्याचे आरक्षण रद्द झाले, असे पवार यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.