Chinchwad : चिंचवड, भोसरीतून ‘घड्याळ’ हद्दपार!

एकेकाळच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीवर उमेदवार पुरुस्कृत करण्याची वेळ

एमपीसी न्यूज – एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणा-या पिंपरी-चिंचवड शहरात आज राष्ट्रवादीची दयनीय अवस्था झाली आहे. पक्षाला विधानसभा निवडणुकीकरिता उमेदवार देखील देता आले नाहीत. शहरातील महत्वाच्या चिंचवड आणि भोसरी मतदारसंघात पक्ष उमेदवार देऊ शकला नाही. एकेकाळचा बालेकिल्ला असलेल्या शहरात अपक्षांना पुरुस्कृत करण्याची वेळ राष्ट्रवादीवर आली. या मतदारसंघातून पक्षाचे चिन्ह हद्दपार झाले आहे. तर, पिंपरी मतदारसंघात देखील उमेदवार बदलण्याची नामुष्की पक्षावर ओढविली आहे.
राज्यभरात पिंपरी-चिंचवड शहर म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखले जात होते. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचा शहरावर एकछत्री अंमल होता. पिंपरी महापालिकेवर 15 वर्ष त्यांची एकहाती सत्ता होती. दादा बोले आणि महापालिका डोले अशी परिस्थिती होती. सत्तेच्या माध्यमातून त्यांनी शहराचा कायापालट देखील केला. पण, राजकीय हवा फिरताच या बालेकिल्याला 2014 च्या विधानसभा निवडणुकीपासून तडे जाऊ लागले. जवळच्या सहका-यांनी साथ सोडली.
दादांच्या मुशीत तयार झालेले लक्ष्मण जगताप आणि महेश लांडगे यांनी 2014 च्या विधानसभा निवडणुकीवेळी पक्षाला रामराम केला. जगताप यांनी भाजपमध्ये प्रवेश करुन कमळाच्या चिन्हावर निवडून आले. त्यानंतर भाजपने जगताप यांच्याकडे शहराध्यक्षपदाची धुरा सोपविली. लांडगे भोसरीतून अपक्ष निवडून आले. त्यांनी महापालिका निवडणुकीवेळी भाजपमध्ये प्रवेश केला.
त्याचदरम्यान ज्येष्ठ नेते आझम पानसरे यांना देखील भाजपमध्ये घेऊन गेले. जगताप, लांडगे, पानसरे या तिघांनी राष्ट्रवादीची महापालिकेतील सत्ता उलथवून लावली आणि पहिल्यांदाच महापालिकेवर एकहाती कमळ फुलविले. तेव्हापासून शहरातील राष्ट्रवादीत मरगळ आली आहे.

विधानसभा निवडणुकीपूर्वी चिंचवड येथे झालेल्या मेळाव्यात राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शहरातील तीनही मतदारसंघ राष्ट्रवादी लढणार असल्याची घोषणा केली खरी परंतु, प्रत्यक्षात दोन मतदारसंघात पक्षाला उमेदवारच देता आले नाहीत. पिंपरी मतदारसंघात देखील अगोदर सुलक्षणा शिलवंत यांना उमेदवारी दिली असताना रात्रीत निर्णय बदलत माजी आमदार अण्णा बनसोडे यांना उमेदवारी दिली. त्यामुळे पक्षाची नाचक्की झाली.
चिंचवडमध्ये पक्षाकडून माजी नगरसेवक प्रशांत शितोळे यांना अर्ज भरायला लावल्याची नौटंकी केली. एबी फॉर्म दिला नसल्याने त्यांचा उमेदवारी अर्ज बाद झाला आहे. त्यामुळे पक्षावर आता अपक्ष उमेदवाराला पुरस्कृत करण्याची वेळ आली आहे.
भोसरी मतदारसंघात तर राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी स्वीकारण्यास कोणीही तयार झाले नाही. माजी आमदार विलास लांडे, नगरसेवक दत्ता साने यांनी पक्षाची उमेदवारी नको अशी भूमिका घेतली. दोघांनीही अपक्ष अर्ज दाखल केले आहे. काथ्याकूट झाल्यानंतर अखेरीस लांडे यांना पुरस्कृत केल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले. शहरातील तीन मतदारसंघापैकी दोन मतदारसंघात कधीकाळचा बलाढ्य पक्ष विधानसभेला साधे उमेदवार देखील देऊ शकला नाही.
एकेकाळी बालेकिल्ला असलेल्या शहरातील दोन विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे घड्याळ चिन्ह आता हद्दपार झाले आहे. चिंचवड आणि भोसरी मतदारसंघात राष्ट्रवादीच्या चिन्हाचा उमेदवार नाही. एकेकाळच्या बालेकिल्ल्यातून आज पक्षाचे चिन्ह हद्दपार होण्याची वेळ आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.