Pimpri News: महापालिका निवडणूक चार महिन्यांवर तरीही राष्ट्रवादी काँग्रेसमधील पदाधिकाऱ्यांचा सूर जुळेना!

एमपीसी न्यूज (गणेश यादव) – 2017 च्या निवडणुकीत गटबाजीमुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ता गमावलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला अजूनही उपरती आली नाही. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसमधील गटबाजी पुन्हा एकदा उफाळून आल्याने चर्चेचा विषय झाला आहे. निवडणूक अवघ्या चार महिन्यांवर आली असतानाही पदाधिकाऱ्यांचे सूर जुळत नाहीत. गटातटात विभागलेल्या स्थानिक नेत्यांनी साहेब, दादांकडे धाव घेत आर्जव केली. खरी, मात्र गटबाजीमुळे परत राष्ट्रवादीच्या इच्छा आकांक्षेला सुरुंग लागेल अशी चिन्हे आहेत.

महापालिकेची आगामी निवडणूक अवघ्या चार महिन्यांवर येऊन ठेपलेली असताना राष्ट्रवादी काँग्रेसमधील गटबाजी उफाळून आली आहे यामध्ये कोणाचा कोणाला ताळमेळ नाही. दोन दिवसांपूर्वी आमदार अण्णा बनसोडे, माजी आमदार विलास लांडे, माजी महापौर आझम पानसरे माजी नगरसेवकांसह राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना भेटून आले. तथापि, या भेटीवर काही स्थानिक नेत्यांनी खासगीत आक्षेप घेतला.

दरम्यान, आझम पानसरे भाजपमध्ये गेले होते पण अधिकृतपणे त्यांची ‘घरवापसी’ झालेली नाही. तर विलास लांडे यांनी 2019 ची भोसरी विधानसभा निवडणूक अपक्ष लढविली होती, त्यावेळी त्यांना पक्ष आठवला नव्हता असा एका गटाचा सूर आहे. तर, दुसरा गट अजित पवार यांच्याकडे भेटीगाठी करताना दिसत आहेत.

बनसोडे, लांडे यांच्यासोबत शरद पवार यांना भेटायला जाताना पक्षाचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, महापालिकेतील विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, सभागृहातील ज्येष्ठ नगरसेवक सोबत नव्हते. यापूर्वी देखील आजी-माजी आमदारांनी शरद पवार यांची भेट घेतली होती त्यावेळीही त्यांच्यासोबत शहरातील एकही पदाधिकारी नव्हता.

या सगळ्या नाट्यमय घडामोडी दरम्यान चिंचवड विधानसभा मतदारसंघातील अपक्ष नगरसेवक, माजी नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला तेव्हा पक्षप्रवेशावेळी आजी-माजी आमदार उपस्थित नव्हते. या कारणावरून राष्ट्रवादी काँग्रेसमधील गटबाजी उफाळून आल्याचे दिसते आणि याचा फटका आगामी निवडणुकीत पक्षाला बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशीच परिस्थिती राहिल्यास महापालिकेतील सत्तेचे स्वप्न कसे पूर्ण होऊ शकेल, अशी चर्चा कार्यकर्ते करत आहेत.

राष्ट्रवादीच्या पदाधिका-यांची तीन गटात विभागणी!

आजी-माजी आमदार शरद पवार यांना भेटतात. तर, शहराध्यक्ष, विरोधी पक्षनेते, माजी महापौर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे जातात. तर दुसरीकडे तरुण नगरसेवक पार्थ पवार यांच्याकडे आपली गा-हाणी मांडतात. त्यामुळे शहरातील राष्ट्रवादीच्या नेत्यांची तीन गटात विभागणी झाल्याचे स्पष्टपणे दिसून येते.

भेटीगाठी दरम्यान एकमेकांच्या तक्रारी केल्या जातात. नात्यागोत्याचे राजकारण आणि गटबाजीमुळे राष्ट्रवादी काँग्रेस महापालिकेतील सत्ताधारी भाजपचा मागील साडेचार वर्षात एकही भ्रष्टाचाराचा मुद्दा तडीस नेऊ शकली नाही हे वास्तव आहे. केवळ मोघम आरोप करत राहिले. पण, पुरावे दिले नाहीत, कोणावर कारवाई होईपर्यंत प्रकरण तडीस नेले नाही. महापालिका इतिहासात पहिल्यांदाच घडलेले स्थायी समिती अध्यक्षांचे लाच आणि अटक प्रकरणाच्या आयत्या मुद्याचे देखील राष्ट्रवादी काँग्रेसला म्हणावे तितके भांडवल करता आलेले नाही.

दरम्यान याबाबत बातचित करताना शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी स्पष्टीकरण देत म्हटले, “पक्षात कोणतीही गटबाजी नाही. घरगुती कार्यामुळे परवा मी बैठकीला जावू शकलो नाही”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.