Pune : शिवसेनेसोबत जाण्यास राष्ट्रवादीचे नेते सकारात्मक; सोमवारी शरद पवार-सोनिया गांधी यांच्यात चर्चा

एमपीसी न्यूज – शिवसेनेसोबत राज्यात सरकार स्थापन करण्यास राष्ट्रवादीचे नेते सकारात्मक असल्याचा सूर उमटला. सरकार स्थापन करण्यासाठी लवकरात लवकर हालचाली कराव्यात, अशी मागणीही यावेळी करण्यात आल्याचे समजते. शिवाजीनगर परिसरातील मोदी बागेत राष्ट्रवादी काँग्रेस कमिटीच्या कोअर कमिटीची बैठक आज आयोजित केली होती. सुमारे दोन तास ही बैठक चालली. सोमवारी शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्यात चर्चा होणार असल्याचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सांगितले.

मंगळवारी दोन्ही पक्षाचे नेते पुढे काय करायचे, यावर चर्चा करणार आहेत. राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी शिवसेने सोबत जाण्यास विरोध केला होता. आज सर्वच नेत्यांशी चर्चा करून शरद पवार यांनी प्रत्येकाची मते जाणून घेतली. तर, काँगेस सोबत निवडणूक लढल्याने त्यांच्या सोबत चर्चा करूनच निर्णय घेणार असल्याचेही मलिक म्हणाले.

शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, धंनजय मुंडे, प्रवक्ते नवाब मलिक, दिलीप वळसे पाटील, सुनील तटकरे हसन मुश्रीफ उपस्थित होते.

भाजप सोबत जाण्यास मर्यादा आहेत. ‘दगडापेक्षा वीट माऊ’ असे सूचक विधान जयंत पाटील यांनी बैठकीपूर्वी केले होते. एकंदरीतच भाजप पेक्षा शिवसेना बरी, असा सूर या बैठकीत उमटला. येत्या 2 दिवसांत काँगेस – राष्ट्रवादी – शिवसेना महाशिव आघाडी स्थापन करायला वेग येणार असल्याची कुजबूज आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.