Pimpri News : स्थायी समितीत राष्ट्रवादीचे सदस्य अर्थपूर्ण मॅनेज?

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेत विरोधी पक्षात असलेल्या राष्ट्रवादीच्या स्थायी समितीतील सदस्यांनी डोळ्यावर पट्टी बांधली असून समितीमध्ये त्यांचा आवाज निघत नाही. स्थायीत मंजूर होणाऱ्या कोणत्याही विषयाला राष्ट्रवादीचे सदस्य विरोध करत नाहीत. एखाद्या विषयावर आपले मतही हे सदस्य बैठकीत मांडत नाही. त्यामुळे स्थायीत राष्ट्रवादी मॅनेज आहे की काय ? असा  प्रश्न उपस्थित केला जात आहे. कोविड केअर सेंटरच्या बिलांबाबत राष्ट्रवादीने चुप्पी साधली. त्यामध्ये राष्ट्रवादीच्या एका नगरसेविकाचा सहभाग असल्याची चर्चा आहे.

महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस प्रमुख विरोधी पक्ष आहे. यापूर्वी सत्तेत असल्याने प्रशासनातील आणि महापालिका कारभारातील सर्व बारकावे पक्षाला माहीत आहेत. पक्षात अनुभवी नगरसेवकांची फौज आहे. सध्या स्थायी समितीमध्ये राष्ट्रवादीच्या सुलक्षणा धर, पोर्णिमा सोनवणे, मयुर कलाटे, पंकज भालेकर हे चार सदस्य आहेत.

शहरातील प्रत्येक कामाचा निधी स्थायी समितीत मंजूर केला जातो. भाजपचे स्थायीत बहुमत आहे. त्यामुळे अनेक विषय भाजपकडून बहुमताच्या जोरावर मंजूर केले जातात. मात्र, हे सर्व होत असताना विरोधी पक्षाची भूमिका महत्त्वाची असते. स्थायीमध्ये मंजुरीसाठी आलेला विषय शहर हिताचा आहे का, हे पाहून संबंधित विषयाला मंजुरी द्यायची की विरोध करायचा, हे या सदस्यांचे काम आहे. मात्र, सध्या राष्ट्रवादीच्या सदस्यांकडून असे काहीही होताना दिसत नाही.

राष्ट्रवादीचे सदस्य स्थायी मध्ये डोळ्यावर पट्टी बांधून असतात. भाजपकडून येणाऱ्या प्रत्येक विषयाला त्यांची मूक संमती असते. त्यामुळे राष्ट्रवादीचे स्थायीचे सदस्य भाजपच्या हातात हात देत स्थायीचा कारभार करत आहेत, अशी जोरदार चर्चा महापालिका वर्तुळात सुरू आहे.

गेल्या काही दिवसांत बोगस एफडीआर, कोविड केअर सेंटर वरील खर्च, एकही रुग्ण नसताना कोविड सेंटरला अदा केलेली 3 कोटी 29 लाखांची बिले, सुरक्षारक्षक नेमणूक, शिक्षण विभागातील खरेदी असे अनेक विषय स्थायीने मंजूर केले. या विषयांना राष्ट्रवादीच्या चारपैकी एकाही सदस्याने विरोध केला नाही. भाजपच्या अजेंड्या प्रमाणेच ते काम करत राहिले. त्यामुळे राष्ट्रवादीच्या या सदस्यांच्या हेतुवर नेहमीच शंका घेण्यात येत आहे.

याबाबत विचारले असता राष्ट्रवादीचे गटनेते तथा विरोधी पक्षनेते राजू मिसाळ म्हणाले, ”स्थायी समितीच्या बैठकीत काय झाले, काय नाही, या बाबत सदस्यांनी चर्चा करायला हवी. यापुढे स्थायी समितीच्या बैठकीच्या आधी आणि बैठकीनंतर  अशा दोन बैठका पक्षाच्या स्थायी सदस्यांच्या घेतल्या जातील”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.