Pimpri News : हप्तेखोरी बंद होणार असल्याने पार्कींग धोरणाला राष्ट्रवादीचा विरोध : नामदेव ढाके

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात वाहने पार्कींगची वाढती समस्या लक्षात घेऊन महापालिकेने पार्किंग धोरण अवलंबविले आहे. या धोरणामध्ये शहरातील वाहन पार्कींग शिस्त लागणार असून रस्त्यांवर बेकायदेशीरपणे उभ्या असणाऱ्या वाहनांना आळा बसणार आहे. मात्र, राष्ट्रवादी पदाधिका-यांची हप्तेखोरी बंद होणार असल्याने त्यांचा पार्कींग धोरणाला विरोध असल्याचा आरोप सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी केला आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये वाहने लावण्यासाठी सत्ताधारी भाजपच्या नेतृत्वाखाली महापालिका पैसे उकळणार आहे. पार्कीगच्या नावाखाली पिंपरी-चिंचवडकरांची लूट करण्याचे भाजपचे हे धोरण असल्याचा आरोप  राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी केला होता.

त्याला ढाके यांनी प्रत्युत्तर दिले आहे. सद्यस्थितीत शहराच्या सर्वच भागामध्ये विशेषत: मोठ्या रस्त्यांच्या कडेला मोठ्या प्रमाणात अवजड व व्यावसायीक वाहने ट्रक, बसेस, ट्रेलर यासारखी वाहने दिवसेंदिवस उभी केलेली असतात. अशा रस्त्यावर अपघाताचे प्रमाण वाढून त्यामुळे वाहतुकीसाठी नेहमी अडथळा निर्माण होत असतो. वास्तविक या ठिकाणी सर्वसामान्यांची वाहने नसून ती सर्व मोठी व व्यावसायिकांचीच असतात.

याबाबतीमध्ये सर्वसामान्य नागरिकांच्या वाहने पार्कींग संदर्भात मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त झाल्यामुळे पार्कींग धोरण लागु करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. यामुळे यामध्ये कुठल्याही परिस्थितीत सर्वसामान्य नागरिकांचे नुकसान होणार नाही. परंतु, शहरातील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची या धोरणामुळे पोटदुखी वाढली आहे.  हप्तेखोरी बंद होणार या कारणामुळे त्यांचा या धोरणाला विरोध सुरु झाला आहे. खर तर या पार्कींग धोरणामध्ये मुळात मोठ्या रस्त्यांवर अवजड व व्यावसायिक वाहने ट्रक, बसेस, ट्रेलर यासारखी वाहने बिनदिक्कतपणे लावली जातात यात सर्वसमान्यांच्या गाड्या नसतात हे राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी लक्षात घ्यावे.

याउलट पार्कींग धोरण लागू केल्यामुळे शहरातील वाढती वाहतुकीची समस्या दुर होणार आहे.  वाहनचालकांना शिस्त लागणार आहे. शिवाय पार्कींग धोरणामुळे पालिकेच्या उत्पन्नातही वाढ होणार आहे. परंतु, राष्ट्रवादीच्या बगलबच्च्यांची हप्तेखोरी बंद होणार असल्याने पार्कींग धोरणाला विरोध करण्याचा केविलवाणा प्रकार राष्ट्रवादीकडून केला जात असल्याचा आरोप सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.