Pune: पुणे आणि पिंपरी – चिंचवड महापालिकेत सत्ता आणण्यासाठी राष्ट्रवादी लागली कामाला

NCP started working to bring power in Pune and Pimpri-Chinchwad Municipal Corporation.

एमपीसी न्यूज – आगामी पुणे आणि पिंपरी – चिंचवड महापालिकेत सत्ता काबीज करण्यासाठी राष्ट्रवादी जोरात कामाला लागली आहे. राष्ट्रवादीच्या मातब्बर नागरसेवकांशी उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांची वारंवार चर्चा सुरू आहे.

कोणत्याही परिस्थितीत सत्ता स्थापन करण्यासाठी पवार यांनी डावपेच आखायला सुरुवात केली आहे. मोठ्या प्रमाणात विकासकामे करूनही 2017 मध्ये सत्ता न मिळाल्याची राष्ट्रवादीला सल आहे.

2019 च्या विधानसभा निवडणुकीत वडगावशेरी आणि हडपसर मतदारसंघात राष्ट्रवादीचे आमदार निवडून आले. खडकवासला मतदारसंघात केवळ 2200 मतांनी राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा पराभव झाला.

पुणे कॅन्टोन्मेंट आणि शिवाजीनगर मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवारांचा केवळ 5 – 5 हजार मतांनी पराभव झाला होता. त्यामुळे आगामी 2022 च्या महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी – काँग्रेस आणि शिवसेना महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढविणार असल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे.

निवडणुकीच्या रणनीतीचाच 1 भाग म्हणून पुणे महापालिकेत आणखी 23 गावांचा समावेश करण्यासाठी अजित पवार यांनी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. या गावांत राष्ट्रवादीची मोठी ताकद आहे.

2017 ची महापालिका निवडणूक 4 चा  प्रभाग म्हणून झाली होती. त्यासाठी भाजपने जोरदार प्रयत्न केले. कोणत्याही परिस्थितीत वॉर्ड किंवा 2 चाच प्रभाग करण्यासाठी राष्ट्रवादीची तयारी आहे.

भाजपच्या ताब्यातून दोन्ही महापालिका ताब्यात घेण्यासाठी हालचाली सुरू आहेत. यापूर्वी 11 गावांचा समावेश करण्यात आला आहे. आणखी 23 गावे समाविष्ट केल्यावर वेगळी महापालिका स्थापन होणार नसल्याचे संकेत अजित पवार यांनी दिले आहेत.

बावधन, किरकटवाडी, कोंढवे – धावडे, म्हाळुंगे, सुस, कोपरे, नांदेड, नर्हे, शेवाळवाडी, खडकवासला, नांदोशी, मांगडेवाडी, भिलारवाडी, मंतरवाडी, कोळेवाडी, हांडेवाडी, होळकरवाडी, पिसोळी, वडाचीवाडी, जांभूळवाडी, कोळेवाडी, गुजर – निंबाळकरवाडी या महापालिका हद्दीलगतच्या गावांचा समावेश होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.