Pune : पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादीचाच राहणार दबदबा! अजित पवार, दिलीप वळसे पाटील, दत्तात्रय भरणे मंत्री

जिल्ह्यात राष्ट्रवादी 10, भाजपचे 9, काँगेस 2, असे एकूण 21 आमदार

एमपीसी न्यूज – पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादीचे नेते अजित पवार उपमुख्यमंत्री, दिलीप वळसे पाटील कॅबिनेट मंत्री आणि दत्तात्रय भरणे राज्यमंत्री झाल्याने याच पक्षाचा दबदबा राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. पुणे शहर आणि जिल्हात शिवसेनेचा एकही आमदार नाही. त्यामुळे पक्षाला ताकद देण्यासाठी मंत्रिपद मिळणार असल्याची चर्चा होती. पण, ती फोल ठरली. तर, काँगेसच्या आमदारालाही मंत्रिपद मिळाले नाही. त्यामुळे आगामी काळात पुणे महापालिका, पिंपरी-चिंचवड, पुणे जिल्हा परिषद तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेत राष्ट्रवादीच्याच नेतृत्वाखाली महाविकास आघाडी काम करणार असल्याचे स्पष्ट आहे.

वडगावशेरी मतदारसंघातून सुनील टिंगरे, हडपसर चेतन तुपे पाटील, मावळ सुनील शेळके, शिरूर अशोक पवार, इंदापूर दत्तात्रय भरणे, आंबेगाव दिलीप वळसे पाटील, खेड – आळंदी दिलीप मोहिते पाटील, जुन्नर अतुल बेनके, पिंपरी अण्णा बनसोडे आणि बारामती अजित पवार, असे पुणे जिल्ह्यात 2019 च्या विधानसभा निवडणुकीत 10 आमदार निवडून आले आहेत. 2 काँगेस, तर भाजपचे 9 आमदार विजयी झाले आहेत.

इंदापूर मतदारसंघात सुरुवातीपासूनच माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या विरोधात दत्तात्रय भरणे यांना अजित पवार यांनी साथ दिली आहे. भरणे यांना पुणे जिल्हा परिषद अध्यक्षपद देण्यापासून आमदारपदी निवडून आणण्यात अजित पवार यांचा मोठा वाटा आहे. चेतन तुपे पाटील यांना पुणे महापालिकेत विरोधी पक्षनेते करण्यात अजित पवार यांचाच शब्द महत्वपूर्ण होता. सुनील शेळके, सुनील टिंगरे, अतुल बेनके, अशोक पवार, दिलीप मोहिते पाटील, अण्णा बनसोडे या सर्वांना निवडून आणण्यापासून तिकीट वाटपापर्यंत अजित पवार यांची भूमिका महत्त्वाची आहे.

2014 च्या निवडणुकीत राष्ट्रवादीचा दारूण पराभव झाला होता. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत ‘मी साहेब यांच्या सोबत’ हे कॅम्पेन जोरात राबविण्यात आले होते. अनेक दिगग्ज मंडळींनी राष्ट्रवादी सोडली. तरी काहीही फरक पडला नाही. त्यातील बहुतांशी नेत्यांचा दनकावून पराभव झाला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.