Pune News : पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याला मारहाण, विनायक अंबेकर मारहाणीचा बदला घेतल्याची चर्चा

एमपीसी न्यूज : राष्ट्रवादी काँग्रेसचे पुण्यातील पदाधिकारी आप्पा जाधव यांना त्यांच्या नारायण पेठेतील कार्यालयात घुसून मारहाण करण्यात आली. मंगळवारी ही मारहाण करण्यात आली. या संपूर्ण मारहाणीचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वायरल होतोय. विश्रामबाग पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही मारहाण भाजपच्या कार्यकर्त्याकडून करण्यात आली असाही आरोप करण्यात येतोय. 

काही दिवसांपूर्वी पुण्यातील भाजपचे प्रवक्ते विनायक अंबेकर यांनी शरद पवार यांच्यावर एक कविता लिहून ती सोशल मीडियावर पोस्ट केली होती. या कवितेवर आक्षेप घेत राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आप्पा जाधव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आंबेकर यांच्या कार्यालयात जाऊन त्यांना शिवीगाळ करत मारहाण केली. त्यानंतर आता आप्पा जाधव यांनाच मारहाण करण्यात आली. याप्रकरणी आप्पा जाधव यांच्यावर गुन्हा देखील दाखल आहे.

यानंतर भाजपने विनायक आंबेकर यांना झालेल्या मारहाणीचा बदला यातून घेतला असल्याची चर्चा सुरू आहे. मंगळवारी आप्पा जाधव हे त्यांच्या कार्यालयात बसले असताना दुचाकीवरून काही युवक आले आणि त्यांनी जाधव यांना मारहाण केली. या सर्व घडामोडी नंतर पुण्यातील राजकीय वातावरण मात्र पुन्हा एकदा तापले आहे. आप्पा जाधव मारहाण प्रकरणी विश्रामबाग पोलिस ठाण्यात 15 ते 20 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.