Pune News : लसीचे डोस करदात्यांच्या पैशांतून, ‘थँक्यू टॅक्स पेयर’ म्हणत राष्ट्रवादी युवक काँग्रेसची बॅनरबाजी

एमपीसी न्यूज – ‘लसीचे डोस करदात्यांच्या पैशांवर खरेदी केले आहेत, असे असताना लसीकरणाच्या माध्यमातून राजकीय श्रेय घेण्याचा प्रयत्न भाजप सरकार करीत आहे,’ असे म्हणत राष्ट्रवादी युवक काँग्रेसने पुण्यात ‘थँक्यू टॅक्स पेयर’ अशा मथळ्याचे बॅनर कोथरूड आणि डेक्कन परिसरात लावले आहेत.

‘तुमच्याच पैशात मोदींजींनी लस विकत घेतली, तुम्हालाच रांगेत उभे करून टोचली, आता शहरात बॅनर सुद्धा तुमच्याच टॅक्सरूपी पैशातून लावले आहेत. मग तुमचे आभार मानले पाहिजे ना राव…! लसीकरणासाठी योगदान देत आहेत पुनावाला, बॅनरबाजी करत आहेत चुनावाला.’ असा मजकूर बॅनरवरती लिहित केंद्र सरकार आणि मोदी यांच्यावर राष्ट्रवादी युवक काँग्रेसने टिका केली आहे.

‘कोरोना लसीकरण हे राष्ट्रीय अभियान आहे. रांगेत उभे राहून लस घेणाऱ्या जनतेच्या सहकार्याने हे अभियान शहरात पार पडत आहे. कर भरणाऱ्या जनतेच्याच पैशातून लस विकत घेऊन, बॅनर बाजी करणाऱ्या मोदी सरकारने श्रेय घेण्याचे कारण काय. खरेतर करदात्या जनतेचे आभार मानणे योग्य ठरेल. लसीकरणानंतर देण्यात येणाऱ्या प्रमाणपत्रावर देखील पंतप्रधान मोदी यांचा फोटो ठेऊन जाहिरातबाजी करणे योग्य नाही. या सर्व गोष्टीचा आम्ही निषेध करत आहोत.’ अशा शब्दात राष्ट्रवादी युवक काँग्रेस, पुणे शहर च्या वतीने सरचिटणीस गिरीश गुरनानी यांनी निषेध व्यक्त केला.

‘लसीकरणानंतर देण्यात येणाऱ्या प्रमाणपत्रावर देखील महाविकास आघाडी सरकारच्या योग्य धोरणाने राज्यात आणि शहरात लसीकरण मोहिमेत सहकार्य मिळाले, परंतु त्याची जाहिरातबाजी करण्यात आली नाही. राजकीय भांडवल करण्यापेक्षा प्रत्येक नागरिकाला लस मिळवून देणे हिताचे ठरेल,’ असे गिरीश गुरनानी म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.