Pimpri: भाजपचे आमदार राम कदम यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची राष्ट्रवादी युवती काँग्रेसची मागणी 

एमपीसी न्यूज – दहीहंडी उत्सावात भाजपचे आमदार व प्रवक्ते राम कदम यांनी मुलींबाबत आक्षेपार्ह असे बेताल वक्तव्य केले आहे. यामुळे देशातील मुली भितीच्या वातावरणात आहेत. त्यामुळे राम कदम यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा जगताप यांनी केली आहे. 

याबाबत पिंपरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना निवेदन दिले आहे. त्यात जगताप यांनी म्हटले आहे की, दहीहंडी उत्सावात भाजपचे आमदार राम कदम यांनी उद्या मला सांगितलेत की एखाद्या मुलीला प्रपोज केले आहे ती नाही म्हणते. तुमच्या आई वडिलांना समोर आणा ते जर म्हटले की मुलगी पसंत आहे तर तिला पळवून आणेन, असे बेताल वक्तव्य केले आहे. त्यामुळे महिलांचा अवमान झाला आहे.

यामुळे देशातील मुली भितीच्या वातावरणात आहेत. मुलींच्या सुरक्षिततेबबाबत ही अति गंभीर बाब आहे. राज्यातील जनतेने भाजप आमदारांना मुलींना पळवून आणण्यासाठी आमदार केले आहे काय?, या आमदारांना सत्तेचा माज आला आहे. कदम यांना निलंबित करावे. तसेच मुलींविषयी खालच्या पातळीवर जाऊन घाणेरडे वक्तव्य केल्याप्रकरणी त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी जगताप यांनी निवेदनातून केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.