Pimpri: राष्ट्रवादीचे  नाना काटे यांची विधानसभेसाठी जोरदार तयारी; वाढदिवसानिमित्त शक्तीप्रदर्शन

एमपीसी न्यूज –  राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व ज्येष्ठ नगरसेवक विठ्ठल (नाना)काटे  यांनी वाढदिवसानिमित्त चिंचवड मतदारसंघात जोरदार शक्तीप्रदर्शन सुरू केले आहे. संपूर्ण विधानसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात त्यांचे ‘फ्लेक्स’ झळकत आहेत. या फ्लेक्सवर ‘लक्ष्य 2019 चिंचवड विधानसभा’ असा मजकूर लिहिला आहे. वाढदिवसाचे निमित्त साधत नानांनी आगामी चिंचवड विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढविणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. 2014 मध्ये हुकलेली संधी 2019 मध्ये खेचून आणण्यासाठी त्यांनी आत्तापासूनच प्रयत्न सुरु केले असल्याची जोरदार चर्चा शहराच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.

नाना काटे यांनी सन 2014 ची विधानसभा निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेसच्या ‘घड्याळावर’ लढविली होती. मोदी लाटेत देखील त्यांनी भाजपला जोरदार टक्कर दिली होती. त्यामुळे आगामी निवडणुकीत भाजपाचा वचपा काढण्यासाठी  काटे यांनी आतापासून जोरदार ‘फिल्डिंग’ लावण्यास सुरुवात केली आहे.

फेब्रुवारी 2017 मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत भाजपची लाट होती. तरीही, नाना आणि त्यांच्या पत्नी शीतल काटे दोघेही पती-पत्नी पिंपळेसौदागरमधून मोठ्या मताधिक्याने निवडून आले आहेत. नाना आणि शीतलताई या दोघांचीही ही नगरसेवकपदाची दुसरी टर्म आहे.  पिंपळेसौदागर परिसरात त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. या परिसरात मतदारांची संख्या जास्त आहे. पिंपळेसौदागर बरोबरच नानांनी संपूर्ण चिंचवड मतदार संघाकडे अधिक लक्ष्य देण्यास सुरुवात करत विधानसभेची निवडणूक लढविण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.

पक्षाच्या पडत्या काळात देखील ते पक्षासोबत निष्ठावंतपणे राहिले आहेत. त्यामुळे जुन्या राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये नाना काटे यांची ताकद अनपेक्षितपणे वाढली आहे. हे ही वारंवार अधोरेखित होत आहे. त्याचमुळे अनपेक्षितपणे उद्या नाना काटे  हे चिंचवडचे आमदार  झाले, तर आश्चर्य वाटायला नको…..! अर्थात हा जर तरचा खेळ….!

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.