BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri : राष्ट्रवादीचा विलास लांडे, राहुल कलाटे यांना पाठिंबा; अजित पवार यांची माहिती

0

एमपीसी न्यूज – भोसरी मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढविणारे विलास लांडे आणि चिंचवड मतदारसंघातून अपक्ष लढविणारे राहुल कलाटे यांना राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस महाआघाडीने जाहीर पाठिंबा दिला असल्याची घोषणा राष्ट्रवादीचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज (बुधवारी) पत्रकार परिषदेत दिली.  

विधानसभा निवडणुकीतील प्रचाराच्या नियोजनासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आजी-माजी नगरसेवक, पदाधिका-यांची पवार यांनी आज कासारवाडी येथे बैठक घेतली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी शहराध्यक्ष संजोग वाघेरे, पिंपरीचे उमेदवार अण्णा बनसोडे, भोसरीचे पुरस्कृत उमेदवार विलास लांडे, विरोधी पक्षनेते नाना काटे, माजी महापौर योगेश बहल, मंगला कदम, शकुंतला धराडे, नगरसेवक दत्ता साने आदी उपस्थित होते.

पवार म्हणाले, भोसरीत अपक्ष निवडणूक लढविणारे विलास लांडे यांना राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस महाआघाडीने पुरस्कृत केले आहे. चिंचवडमधून अपक्ष लढणा-या राहुल कलाटे यांना पाठिंबा दिला आहे. त्यांच्याकडून आघाडीसोबत राहण्याची हमी घेण्यात आली आहे. त्यांना मी अनेक वर्षांपासून ओळखत आहे. त्यामुळे दोघेही आघाडीसोबत राहतील याची मला खात्री आहे.

आघाडीमध्ये शहरातील तीनही मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसला सुटले आहेत. त्यामुळे उमेदवार द्यावा की पुरस्कृत करावे याचा निर्णय घ्यायचा आमचा अधिकार आहे. त्यामुळे काँग्रेसने नाराज होऊ नये. पुरस्कृत उमेदवारांना पाठिंबा देण्यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याशी बोलू, त्यांना विनंती केली जाईल.

भाजपच्या उमेदवारांचा पराभव करण्यासाठी भोसरी, चिंचवडमध्ये उमेदवार नाही

आघाडीच्या जागा वाटपाच्या सूत्रामध्ये पिंपरी-चिंचवडमधील तीनही मतदारसंघ राष्ट्रवादीच्या वाट्याला आलेले आहेत. या मतदारसंघातून उमेदवारी मिळावी, यासाठी पक्षातील अनेक पदाधिकारी इच्छुक होते. उमेदवारी मिळावी, यासाठी इच्छुकांच्या मुलाखती देखील झाल्या होत्या. त्यातील काही नावांवर शिक्कामोर्तब देखील झाले होते. मात्र, विधानसभेच्या निवडणुकीत शिवसेना, भाजपच्या उमेदवारांचा पराभव करण्यासाठी भोसरी आणि चिंचवड मतदारसंघात पक्षाचा उमेदवार निवडणुकीत उभा न करता अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या उमेदवारांना पुरस्कृत करण्यचा निर्णय घेण्यात आल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले.

पाठिंबा दिल्याबाबत राहुल कलाटे यांनी मानले आभार

निवडणूक लढविताना एक-एक मत महत्वाचे आहे. मला पाठिंबा दिल्याबद्दल देशाचे ज्येष्ठ नेते शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मी आभार मानतो.  पवार कुटुंबीयांशी आपले कौटुंबिक संबंध आहेत. आघाडीसोबत राहण्याबाबत विचारले असता निवडून तर येऊ द्या, अगोदर असे त्यांनी सांगितले.

HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3