India Corona Update : तिसऱ्या दिवशीही रुग्ण संख्या तीन लाखांच्या पार , 24 तासांत 3.46 लाख कोरोना रुग्णांची नोंद

एमपीसी न्यूज – देशात कोरोना रुग्णांची वाढ एकदिवसीय रुग्णवाढीचे जागतिक रेकॉर्ड तोडत आहे. गुरुवारपासून देशात तीन लाखांहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद होत असून, आज देखील (शनिवारी) सलग तिसऱ्या दिवशी मागील 24 तासांत देशभरात तब्बल 3 लाख 46 हजार 786 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असून, ही आजवरची जगातील सर्वात मोठी एकदिवसीय रुग्ण वाढ आहे.

आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने एएनआयने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1 कोटी 66 लाख 10 हजार 481 एवढी झाली आहे. त्यांपैकी 1 कोटी 38 लाख 67 हजार 997 जण कोरोनामुक्त झाले आहेत. गेल्या 24 तासांत 2 लाख 19 हजार 838 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.

चिंताजनक बाब म्हणजे देशात सक्रिय रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली असून, सध्या 25 लाख 52 हजार 940 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मागील 24 तासांत 2 हजार 624 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. आतापर्यंत 1 लाख 89 हजार 544 जण कोरोनामुळे मृत्यूमुखी पडले आहेत. देशाचा कोरोना मृत्यूदर 1.14 टक्के एवढा आहे‌. देशाचा रिकव्हरी रेट सध्या 83.48 टक्के एवढा झाला आहे.

देशात आजवर 27 कोटी 61 लाख 99 हजार 222 नमूने तपासण्यात आले आहेत. त्यापैकी 17 लाख 53 हजार 569 चाचण्या शुक्रवारी (दि. 23) करण्यात आल्या आहेत. आयसीएआरने याबाबत आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.

देशात लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत आतापर्यंत देशात 13 कोटी 83 लाख 79 हजार 832 जणांना कोरोना प्रतिबंधक लस टोचण्यात आली आहे.

मागील तीन दिवसांपासून देशात दररोज तीन लाखांहून अधिक कोरोना बाधित रुग्णांची नोंद होत आहे. तीन दिवसांत देशात जवळपास दहा लाख कोरोना बाधित रुग्णांची भर पडली आहे. तर, मागील दहा दिवसांत जवळपास पंचवीस लाख नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे बरे होणा-या रुग्णांची संख्या देखील वाढली असून, दररोज दिड ते दोन लाख रुग्ण कोरोनामुक्त होत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.