Chakan : चाकण हिंसाचाराच्या सखोल चौकशीची गरज

एमपीसी न्यूज – चाकण येथे 30 जुलै रोजी झालेल्या हिंसाचाराच्या घटनांचा क्रम आणि त्यासाठी कारणीभूत असलेली परिस्थिती याची कारणमीमांसा करून, ही घटना घडविण्यासाठी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरीत्या नेमक्या कोणत्या व्यक्ती किंवा व्यक्तींचा गट किंवा संघटना कारणीभूत होत्या याचा अचूक शोध घेण्याची मागणी होत आहे.

पाच तास चाकण पेटलेले असताना निर्माण झालेली परिस्थिती हाताळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आणि पोलिस यंत्रणेने कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी केलेले नियोजन व तयारी पुरेशी होती काय ?  ही परिस्थिती हाताळण्यासाठी पोलिसांकडून योग्य कारवाई झाली होती काय? याचीही सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे.

चाकण हिंसाचाराची सखोल चौकशी अद्यापही सुरूच आहे. हिंसाचारामध्ये झालेल्या नुकसानीचे पंचनामे प्रशासना कडून करण्यात आले आहेत. दहा कोटी रुपयांची संपत्ती आगीच्या हवाली करण्यात आल्याचे स्पष्ट झाले.  आतापर्यंत ३० जणांना अटक करण्यात आली असून मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे शेकडो संशयितांची चौकशी सुरु आहे. मात्र चाकण ही परिस्थिती एवढी हाताबाहेर कशी काय गेली ? स्थानिक पोलिसांनी काय नियोजन केले होते, किती बंदोबस्त मागविला होता ? पाच तास हिंसा सुरु असताना मदत कशी मिळाली नाही ? या बाबत नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

मराठा आरक्षणासाठी स्थानिकांनी शांततेत काढलेल्या मोर्चाला गालबोट लावण्यासाठी स्वतंत्रपणे आलेल्या एका मोठ्या जमावाने अचानक आक्रमक भूमिका घेतली होती. चाकण शहरात एकाच वेळी अनेक ठिकाणी जाळपोळ व दगडफेकीच्या घटना घडल्यामुळे हाताच्या बोटावर मोजण्या एवढ्या बंदोबस्तावरील पोलिसांना हजारोंच्या संखेने असलेल्या जमावाला शांत करता आले नाहीच, शिवाय हिंसाचार सुरु झालेल्या सर्वच ठिकाणी वेळेत पोहचता आले नाही.

अत्यंत आक्रम झालेल्या त्या जमावाने नंतर पोलिसांवर हल्ले करण्याचे सत्र अवलंबले त्यामुळे पोलिसांवर स्वतःचा जीव वाचविण्याची वेळ आली. या माध्यमातून काहींनी पोलिसांशी असलेले व्यक्तिगत वाद निपटून काढण्यासाठी टार्गेट करून पोलिसांवर खुनी हल्ले करून पोलीस ठाण्याच्या समोर जाऊन त्यांची वाहने जाळली. कुठेही मोबाईल कॅमेर्यात आपली छबी येऊ नये म्हणून नागरिक, पोलीस , पत्रकार यांचे शेकडो मोबाईल फोन फोडण्यात आले. जबर मारहाणही करण्यात आली.

30 जुलै रोजी स्थानिक मराठा बांधवानी सर्व जाती धर्माच्या समाज बांधवांच्या समवेत काढलेला मराठा क्रांती मोर्चा चाकण येथील मार्केट पासून तळेगाव चौकात पोहोचण्यापूर्वीच चौकात शकडोंचा जमाव आधीपासून येऊन थांबला होता. संबंधित जमाव दंगल घडविणार याची कुणकुण लागलेल्या स्थानिक पत्रकारांनी येथील पोलीस अधिकाऱ्यांच्या निदर्शनास ही बाब आणून देऊनही दुर्लक्ष करण्यात आले. नंतर हिंसाचार करण्यात त्याच जमावाचा हात असल्याचे निष्पन्न झाले आहे. सीसीटीव्ही फुटेज आणि घटनास्थळी काढण्यात आलेल्या व्हिडिओ क्लिप्सच्या आधारे विशेष पथकांना याविषयी तपास करण्याचे आदेश वरिष्ठांनी दिले आहेत. या माध्यमातून सर्वसत्य बाहेर येईल, असा स्थानिकांना विश्वास आहे.

चाकण हिंसाचारात दहा कोटीपेक्षा जास्त मालमत्तेचे नुकसान झाले आहे. हिंसाचाराचे लोण अन्यत्र पसरु नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून चाकण शहरात पोलीस डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवीत आहेत. लोखंडी गज, इंधनांचे कॅन, आगपेट्या, दगड, लाठयाकाठयांसह सज्ज होऊन आलेल्या जमावाने तुफान दगडफेक करीत जाळपोळ, केली. पोलिसांसह, पत्रकार, नागरिक या हिंसाचारात जखमी झाले होते. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह , पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांनी आपले कौशल्य आणि स्थानिक लोकप्रतिनिधी, नागरिक, सकल मराठा समाजाचे स्थानिक समन्वयक व कार्यकर्ते यांच्या मदतीचा वापर केला त्यामुळे शहर आणि बाजारपेठ हिंसाचारातून वाचली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.