Pimpri : समुपदेशनातूनच विझतील उथळ प्रेमाचे निखारे !

एमपीसी न्यूज – वयाची अठरा वर्ष ओलांडली की मुले कायद्याने सज्ञान होतात. स्वतःचे निर्णय स्वतः घेण्याचा अधिकार त्यांना प्राप्त होतो. साधारणतः वयाच्या अठराव्या वर्षी बारावी संपून महाविद्यालयाचा रस्ता मिळालेला असतो. त्यामुळे उच्च माध्यमिक विद्यालयापेक्षा उच्च महाविद्यालयात आणखी मोकळीक मिळणार. हवं तसं करता येणार अशीच काहीशी समजूत करून महाविद्यालयीन शिक्षण सुरु होतं. मग कसल्यातरी आकर्षणाला किंवा हवंहवंसं वाटणा-या गोष्टी अन व्यक्तींना प्रेमाचं नाव देऊन नवी नाती तयार केली जातात. त्या नात्यांमध्ये हळुवारपणे अडकायला सुरुवात होते. प्रेमाच्या नात्याला लग्नाच्या बंधनात अडकविण्यासाठी बराच खटाटोप केला जातो. त्यात काही जणांना यश येतं तर काही जण अपयशामुळे निराशेच्या गर्तेत अडकतात. महाविद्यालयीन किंवा लग्नापूर्वीच्या प्रेमाचं भूत लग्नानंतरही मानगुटीवरून उतरता उतरत नाही. यातच एखाद्याच्या चुकीमुळे संपूर्ण घरच्या-घर बेचिराख होते. याविषयी सविस्तर चर्चा करणारा हा लेख. . . 

प्रेम ही खूप नाजूक भावना आहे. प्रेम हे आर्थिक, सामाजिक किंवा अन्य कोणतेही निकष लावून होत नाही. तर ते केवळ भावनिक निकषांवर होते. एकमेकांना समजून घेणं, एकमेकांच्या भावनांची कदर करणं आणि एकमेकांचा आधार होणं हे प्रेमामध्ये सर्वात महत्वाचं आहे. प्रेम निभावण्यासाठी आयुष्यभर एकत्र असायलाच हवं, असं काहीच नाही. एकमेकांपासून दूर राहून, ठराविक कालावधीनंतर एकमेकांसोबत काही वेळ घालवून सुद्धा प्रेम जपता येतं. आपण ज्याच्या प्रेमात पडतो, ती व्यक्ती आपल्याजवळ सतत असायला हवी, असं सर्वांनाच वाटतं. कारण सतत त्याच्याशी काहीतरी शेअर करायची प्रबळ इच्छा असते. त्याचा सहवास हवा असतो. पण व्यावहारिक जगात ते बहुतांश वेळेला शक्य होत नाही. मग अशा वेळी समजूतीचा सुवर्णमध्य साधायला हवा. 

समजूतीचा सुवर्णमध्य सहसा काढलाच जात नाही. त्याऐवजी ‘जियेंगे तो एकसाथ, मरेंगे तो एकसाथ’ अशा काहीशा भंपक आणाभाका घेऊन संपूर्ण आयुष्यावर धोंडा मारून घेतला जातो. मागच्या आठवड्यात पिंपरी-चिंचवडमध्ये अशीच एक घटना घडली. एका मुलीचे एका मुलासोबत लग्नापूर्वी प्रेमसंबंध होते. त्या दोघांनी आपले लग्न होण्यासाठी प्रयत्नही केला. पण मुलीच्या घरच्यांना हे कदापि मान्य नव्हते. मग मुलीच्या घरच्यांनी चिडून जाऊन आपल्याच नातेवाइकांमधील एका मुलासोबत मुलीचे लग्न लावून दिले. मुलगी सुद्धा आनंदाने सासरी नांदायला गेली. मुलगी आनंदाने नांदायला जातेय हे पाहून मुलीच्या घरच्यांच्या आनंदाला पारावर उरला नाही. मोठ्या थाटात मुलीचा विवाह सोहळा पार पडला. पण मुलीच्या मनात सुडाचं वेगळंच रसायन तयार होत होतं, हे कुणाच्याही लक्षात आलं नाही. 

लग्नानंतर आठ दिवसांनी नव्या जोडीने बाहेर फिरायला जाण्याचा बेत आखला. उत्साहात फिरायला जाण्याची तयारी झाली. नवीन कपडे, खाण्यापिण्याच्या वस्तू आणि अन्य बरेच काही सोबत घेऊन महाबळेश्वरच्या दिशेने त्यांची चारचाकी गाडी धूळ उडवीत निघाली. आपल्या बायकोला कसलीही कमतरता भासू नये म्हणून नव-या मुलाने देखील सर्व खबरदारी घेतली होती. वाईजवळ पसरणी घाटात गाडी येताच मुलीला उलट्या होऊ लागल्या. काही जणांना गाडीचा प्रवास सहन होत नाही, त्यात घाटाचा रस्ता असल्याने असा त्रास होऊ शकतो, अशी समजूत काढत त्याने तिला खाली उतरवून थोडा आराम करायला सांगितला. दोघेही एका कठड्यावर आराम करत असतानाच घाटातून दोन दुचाकींवरून चौघेजण आले आणि नवऱ्या मुलावर कोयत्याने सपासप वार केले. तो रक्ताच्या थारोळ्यात पडला. तिने त्याला वाचविण्यासाठी हल्लेखोरांसोबत हातापायी केली, पण तिला दूर ढकलून देऊन हल्लेखोरांनी त्याला बेदम मारले. यात नव-या मुलाचा मृत्यू झाला. नव्या संसाराची नवी सुरुवात करण्याआधीच काळाने घाला घातला. मुलगी लग्नानंतर आठव्या दिवशी विधवा झाली. याचे मुलीच्या घरच्यांना खूप वाईट वाटले. पण आता इलाज नव्हता. 

हा सर्व प्रकार पोलिसांपर्यंत गेला. पोलिसांनी प्रकरणाचा दोनच दिवसात छडा लावला. यातील आरोपी म्हणून नवरी मुलगी आणि तिचा लग्नापूर्वीचा प्रियकर या दोघांना अटक करण्यात आली आणि मुला-मुलीच्या घरच्यांसोबत परिसरातील कित्येक लोकांचे डोळे चक्रावले. पोलीस तपासाअंती समोर आलेले तथ्य प्रेम, विश्वास, नाती या सर्वांनाच काळिमा फासणारं होतं. घरच्यांनी घेतलेल्या निर्णयाचा सूड नव्या नव-या मुलावर उगावण्यासाठी नवरी मुलगी आणि तिच्या लग्नाआधीच्या प्रियकराने मिळून हा संपूर्ण खटाटोप केला होता. तिचं फिरायला जाणं, जाताना सेल्फी काढणं, मेड फॉर इच ऑदर असल्याचं भासवणं हा सगळा प्लॅनचा भाग होता. त्याच्या प्लॅनमध्ये काहीही चुकी नसणारा नवरा मुलगा मात्र निर्दयीपणे मारला गेला. या प्रेमाला नेमकं कोणत्या प्रकारात टाकता येईल ? आणि त्यापुढे जाऊन याला प्रेम म्हणावं का ? असा प्रश्न निर्माण होत आहे. 

थोड्या अधिक फरकानं अशी बरीच उदाहरणे घडत आहेत. वड्याचं तेल वांग्यावर काढून उगाच नाती जपल्याचा आव आणला जात आहे. प्रेम हे ठरवून करण्याची गोष्ट नाही किंवा ते ठरवून होतंही नाही. मनाला भावणारं कोणी मिळालं की आपण तिकडे आकर्षित होतो. अशा वेळी हे केवळ काही गोष्टींपुरतं आकर्षण आहे की खरोखर आपल्या जोडीदाराला काळजी आहे. हा विचार आपला आपण करायला हवा. त्याचबरोबर ज्या पालकांनी आपल्याला जन्म दिला, लहानाचं मोठं केलं, आपल्या सगळ्या इच्छा आणि गरजा बाजूला ठेऊन मुलांच्या इच्छा पूर्ण केल्या, मुलांच्या उज्वल भविष्यासाठी आयुष्यभर हाल सोसत मुलांमध्येच आपली स्वप्ने शोधली; अशा पालकांचा फक्त एकदा विचार करायला हवा. त्यांना काय वाटेल ? तसेच स्वतःच्या भविष्याचा देखील विचार मुलांनी करायला हवा. 

पालक आणि मुलांमध्ये मैत्रीपूर्ण नातं असायला हवं. मुलांनी एखादी गोष्ट सांगितली आणि ती चुकीची असेल तर बहुतांश पालक मुलांवर चिडतात, त्यांना ओरडतात. असं न करता त्यांच्या कलानं घेत, त्यांची चूक पटवून द्यायला हवी. तरच मुलांना पालकांवर विश्वास वाटेल. कोणतीही गोष्ट सांगण्यासाठी भीती वाटणार नाही. मुलं चुकीची असतील पण ती कशी चुकीची आहेत यासोबतच बरोबर काय आहे, हे देखील पटवून देता आलं पाहिजे. तसेच केवळ आपलंच बरोबर असं न करता थोडा मुलांच्या देखील बाजूने विचार करायला हवा. त्यांना काय आवडतं, त्यांचा स्वभाव कसा आहे, त्यांच्या विरोधात गेल्यानंतर ती कोणत्या थराला जाऊ शकतील आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या निर्णयाने मुलं आनंदित राहतील का ? हा विचार पालकांनी करायला हवा. त्यासाठी पालक आणि मुलांमध्ये मैत्रीपूर्ण मनमोकळा संवाद असणं गरजेचं आहे. 

शाळा-महाविद्यालयांमध्ये असताना चांगल्या-वाईट मुलांची संगत मिळते. भविष्यासाठी घेतल्या जाणा-या निर्णयांवर त्या संगतीचा परिणाम होतो. मित्र चांगले असतील तर सकारात्मक विचार येतात आणि मित्र चुकीच्या मार्गाने जाणारे असतील तर त्यांच्याकडून मिळणारे सल्लेसुद्धा नकारात्मक मिळतात. त्यामुळे आपली घरची परिस्थिती, पालकांची तळमळ, भविष्याचा वेध घेत पालक आणि मुलांनी एकमेकांच्या कलानं घ्यायला हवं. रागाने किंवा भडकून निर्णय घेतल्यास घाटातले अपघात होतंच राहतील. त्यामुळे घरेच्या-घरे बेचिराख होतील. सामाजिक वातावरण कलुषित होईल आणि अशा घटना पुरोगामी विचारांच्या महाराष्ट्राला आणि विविध संस्कृतींनी नटलेल्या भारताला पुढे नेण्यास मारक ठरतील. 

पोलीस उपायुक्त गणेश शिंदे याबाबत बोलताना म्हणाले, "मागील काही वर्षांपर्यंत लग्नापूर्वी एखाद्या मुला-मुलीने एकमेकांकडे बघण्यावर सुध्दा सामाजिक बंधने होती. काही वर्षांपासून भारतात पाश्चिमात्य संस्कृतीने शिरकाव केला. त्यातून त्यांच्या खानपानाच्या पद्धती, कपडे, राहण्याच्या पद्धती यांपासून ते लग्नापूर्वीचे प्रेमसंबंध, लिव्ह इन रिलेशन इथपर्यंतच्या गोष्टी भारतीय समाजात पसरल्या गेल्या. पाश्चिमात्यांचा समजूतदारपणा, सारासार विचार करण्याची पद्धत भारतीयांनी घेतलीच नाही. त्यामुळे लग्नापूर्वीचे प्रेमसंबंध लग्नानंतर सुद्धा पुढे सुरु असल्याचे काही प्रकार समोर येत आहेत. अशा घटनांमुळे सामाजिक वातावरण बदलले असून याबाबत वैचारिक जनजागृतीसह मुला-मुलींनी सारासार विचार करण्याची शैली विकसित करायला हवी. अशा घटनांमध्ये पालक आणि मुले या दोघांनी देखील सामंजस्याची भूमिका घेऊन सारासार विचार करायला हवा"

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.