Chinchwad : अवयवदानाबाबत जनजागृतीची गरज – रो. राकेश सिंघानिया

एमपीसी न्यूज –  अवयवदान हे श्रेष्ठदान आहे, अवयवदान केल्याने गरजू रुग्णाला जीवनदान मिळते.  सध्या अनेक गरजू रुग्णांना अवयवदानाची गरज आहे. मात्र याबाबत पुरेशी जनजागृती नसल्याने अवयवदान केले जात नाही. यासाठी महाराष्ट्र शासनाकडून अवयवदानाबाबत मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात येत आहे. तसेच अनेक सामाजिक संस्था देखील अवयवदान अभियान मोठ्या  प्रमाणावर राबवित आहेत, अशी माहिती निगडी रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष राकेश सिंघानिया यांनी दिली. 

यावेळी रोटरी क्लब ऑफ निगडीचे अध्यक्ष सुभाष जयसिंघानी, सचिव जगमोहन गुरुजी, रो. रवींद्र कदम आदी उपस्थित होते. यावेळी ज्येष्ठ अभिनेते नासिरुद्दीन शहा व रत्ना पाठक शहा यांची अवयवदान याबाबत चित्रफित दाखविण्यात आली.

चिंचवड येथील रोटरी कम्युनिटी सेंटरमध्ये अवयवदानांबाबत जनजागृती याविषयावर (शुक्रवारी दि. 3 ) मार्गदर्शन करण्यात आले. 9 ऑगस्ट रोजी सकाळी अकरा ते सहा यावेळेत अवयवदानांबाबत ऑनलाईन फॉर्म भरुन घेण्यात येणार आहेत.

राकेश सिंघानिया म्हणाले की, अवयवदान जिवंतपणी देखील करता येते. यामध्ये यकृताचा काही भाग व एक किडनी फक्त जवळच्या नातेवाइकांना दान करता येते. ब्रेनडेड अवस्थेनंतर देखील अवयवदान करता येते. रुग्ण अतिदक्षता विभागात (आयसीयू) कृत्रिम श्वसनावर (व्हेंटिलेटर) असला तरच अवयवदान करता येते. साधारणपणे ब्रेन हॅमरेज व अपघातात मेंदूला इजा झाली असली तर ब्रेनडेड अवस्था येण्याची शक्यता असते, बहुतेक सर्व चांगल्या स्थितीत असलेले अवयव जवळच्या नातेवाइकांच्या संमतीने दान करता येतात. दानाचा लाभधारक सहकारी यंत्रणा ठरवते. अवयवदानानंतर देह अंत्यसंस्कारासाठी परत मिळतो.यावेळी आम्ही ही अवयवदान करणार अशी शपथ रोटरीयन सभासदांनी घेतली.

सिंघानिया पुढे म्हणाले की, अवयवदान कुठे व कसे करायचे, याबाबत लोकांमध्ये जागरुकता नाही. भारतात असलेल्या धार्मिक चालीरिती आणि त्याचा समाजावर असलेला पगडा यामुळे समाजात अवयवदान करण्याची मानसिकता दिसून येत नाही. त्यामुळे अशा लोकांमध्य जागरुकता निर्माण करणे गरजेचे आहे. समाजाचे आपण काहीतरी देणं लागतो. ही भावना जरी प्रत्येकाच्या मनात रुजली तरी अवयवदानाबाबत लोकांच्या मनात जनजागृती निर्माण होईल. परंतु हे एका रात्रीत पूर्ण होणे शक्य नाही. यासाठी सर्वाना मनापासून एकत्र येणे गरजेचे आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.