जातीच्या या जंजाळातुन कसे सुटायचे ?

(हर्षल आल्पे)

एमपीसी न्यूज- गेले अनेक दिवस वर्तमानपत्रातुन जाती बाहेर विवाह केल्याच्या रागातुन हत्या केल्याच्या बातम्या येत आहेत. मुळात जात-पात मानणं,  त्याचा अट्टाहास करणं माणूसकीला धरुन नाही. अनेक थोरा-मोठ्यांनी, संतांनी समाजाला यासाठी जागृत केलं होतं. मग आमच्या संतांच कार्य समाजापर्यंत पोहोचलंच नाही का, असा प्रश्न उपस्थित होतो.

काही वर्षांपूर्वी सैराट नावाचा चित्रपट आला होता. त्यात शेवटी जातीच्याच कारणावरुन त्या मुलीचा भाऊ डोक्यात राग घालुन अत्यंत वाईट रितीने दोघांची हत्या करतो. शेवटी ते बाळ रक्ताच्या थारोळ्यातून चालत सुटतं ज्याला काहीच कळत नाहीये, की नक्की काय झालं ? हे दृश्य उपस्थित प्रेक्षकांच्या काळजाचा ठाव घेतं.

या प्रेक्षकांमध्ये कदाचित अशीही लोकं असतील जे अशा हत्यांमध्ये सामील होते. मग असं दिसत की त्यांनी कदाचित चुकीचाच धडा घेतला असंच यातुन दिसतं. सिनेमा नेहमी आरश्यासारखं काम करत असतो. तो जसा जनजागृती करत असतो तसंच तो न्याय प्रक्रियेकडे दादही मागत असतो. या न्याय प्रक्रियेत एकुण समाज ही येत असतो. मग यावेळी आमचा समाज काही अपवाद वगळता सुधारत का नाहीये ?

सध्याची तरुण पिढी या जातीभेदाबद्दल प्रश्न उपस्थित करत असते कारण त्यांना जात-पात वगैरे कळत नाही. आमच्यातला एखादा अंतराळात जाऊन पराक्रम करुन आला किंवा अत्यंत सामान्य घरातला मुलगा खूप मोठ्या पदावर पोचला तर आम्ही त्याला कधी जात विचारत नाही. उलट त्याच्यामुळे आम्हाला देशासाठी काहीतरी करायची प्रेरणा मिळत असते. कम्प्युंटर वापरणारी, इंटरनेट वापरणारी आजची तरुण सुशिक्षित पिढी जर जातीमुळे हत्या करायला प्रवृत्त होत असेल तर हे समाजाचं खूप मोठं अपयश आहे आणि दुर्देवही आहे.

एकविसाव्या शतकात जन्मलेली पिढी जात-पात विरहित समाज असलेली सकाळ जरुर पाहील आणि नुसती पाहाणारच नाही तर त्याचा संभाळ करेल असे आशादायक चित्र पाहायला मिळेल अशी अपेक्षा आहे. तूर्तास या घटना पूर्णपणे थांबुन पिडीतांना न्याय मिळेल हीच आशा …
सर्वात शेवटी कविवर्य सुरेश भटांच्या ओळी आठवतात

‘उषःकाल होता होता काळरात्र झाली
अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली या ओळींपुढे मनापासुन एवढंच जोडावस वाटतं
अन लावा दिवे अन पुसुन टाका अंधार हा जातीचा’

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
HB_POST_END_FTR-A2
You might also like