Akurdi : शैक्षणिक धोरणात बदल करणे आवश्यक – डॉ. रमेश उन्नीकृष्णन

एमपीसी न्यूज –  भारतामध्ये खूप मोठया प्रमाणावर बौद्धिक संपदा आहे. परंतु, देशात त्यांच्या बौद्धिक क्षमतेला प्रोत्साहन व आवश्यक संधी उपलब्ध होत नसल्यामुळे आजचे उच्च शिक्षित तरूण परदेशामध्ये जातात. देशामध्ये उच्च शैक्षणिक धोरणात बदल करतानाच कालसुसंगत नवीन अभ्यासकम, जास्तीत जास्त प्रत्यक्ष कामावर आधारीत शिक्षण दिले पाहिजे. अशा अभ्यासाचा विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी उपयोग होउन त्यांच्यामध्ये आत्मविश्‍वास निर्माण होतो, असे मत एआयसीटीइचे संचालक डॉ. रमेश उन्नीकृष्णन यांनी व्यक्‍त केले.

पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट (पीसीईटी) संचलित एस. बी. पाटील व्यवस्थापन महाविद्यालय आणि सेंटर फॉर एज्युकेशन ग्रोथ रिसर्च (सीईजीआर) यांच्या संयुक्‍त विद्यमाने शनिवारी (15 जून) आकुर्डी येथील एसबीपीआयएममध्ये उच्च शिक्षण संस्थांच्या प्रतिनिधींच्या चौथ्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी एसबीपीआयएमचे संचालक डॉ. डॅनियल पेनकर, सीईजीआरचे संचालक रविश रोशन, एआयसीटीईचे सदस्य सचिव ए. पी. मित्तल, डॉ. डी. वाय.पाटील इंटरनॅशनल अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रभातरंजन, अजिंक्य डी.वाय.पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ई. बी. खेडकर, एमआयटी विश्‍वशांती विद्यापीठाचे डॉ. श्रीहरी, सुर्यदत्ता शैक्षणिक संस्थेचे डॉ. संजय चोरडीया, एएसएम ग्रुपचे चेअरमन डॉ. संदीप पाचपांडे, डॉ. डी. वाय. पाटील एज्यूकेशन फेडरेशनचे शैक्षणिक संस्थेचे डॉ. सुशांत पाटील आदी उपस्थित होते.

डॉ. डेनियल पेनकर आपल्या प्रास्ताविकात म्हणाले की, उच्च शिक्षण क्षेत्रामध्ये अनेक महत्वाचे बदल होत आहेत. यामुळे विज्ञान, तंत्रज्ञान क्षेत्राचा झपाटयाने विकास होतो आहे. त्यानुसार संशोधन, विकास, औद्योगिक उत्पादन, विक्री विपणन, व्यवस्थापन क्षेत्रांसाठी कुशल मनुष्यबळाची गरज वाढत आहे. त्यासाठी काळानुरूप अभ्यासकमात बदल करणे गरजेचे आहे. यासाठी शैक्षणिक संस्थांनी एकत्र येऊन काम करण्याची आवश्यकता आहे, अशी अपेक्षा डॉ. पेनकर यांनी व्यक्‍त केली.

सीईजीआरचे संचालक रविश रोशन मार्गदर्शन करताना म्हणाले, उच्च शिक्षणात अनेक नवीन अभ्यासकम सुरू होत आहेत. औद्योगिक बाजार पेठेतील कुशल तंत्रज्ञानाची आवश्यकता विचारात घेऊन हे अभ्यासकम राबविले जात आहेत. अशा प्रकारच्या चर्चासत्रांमधून शैक्षणिक संस्थाच्या तज्ज्ञांशी संवाद साधण्याची संधी मिळते. तसेच अभ्यासक्रमांत कोणता बदल करणे आवश्यक आहेत. त्यातील अडचणी याबाबत माहिती मिळते, असे डॉ. रोशन यांनी सांगितले.

डॉ. मित्तल म्हणाले, दर्जेदार शिक्षणासाठी महाराष्ट्राची शैक्षणिक हब म्हणून ओळख निर्माण झाली आहे. पुण्यामध्ये उत्कृष्ट शिक्षण देणा-या संस्था, प्राध्यापक वर्ग आहेत. याचबरोबर मुंबई, नागपूर आदी शहरांमधूनही अशाप्रकारच्या संस्था उभ्या रहात आहेत. सरकारने राबविलेल्या विविध योजनांमुळे उद्योगांमधील रोजगार संधी वाढल्या आहेत. मात्र याबरोबरच पर्यटन, बांधकाम, संगणक तंत्रज्ञान या क्षेत्रातही रोजगार वाढत आहेत. युएसएमध्ये दर वर्षी सरासरी 57 हजार पेटंटची नोंदणी होते. तर भारतामध्ये केवळ हजार, दीड हजार पेटंटची नोंदणी होते. याबाबतची जागृती वाढवण्याची गरज आहे. केरळसारख्या राज्यात  विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कामावर जाऊन प्रात्यक्षिक आधारीत शिक्षण दिले जाते. त्याप्रमाणे इतर राज्यांमध्येसुध्दा अशाप्रकारचे  प्रत्यक्ष अनुभवावरील शिक्षण दिले पाहिजे. आपली मुले परदेशी शिक्षणासाठी जातात. त्याऐवजी परदेशातील मुले आपल्याकडे शिक्षणासाठी आली पाहिजेत. त्यासाठी पायाभूत सेवा-सुविधांची उभारणी केली पाहिजे, असेही डॉ. मित्तल म्हणाले.

डॉ. प्रभात रंजन म्हणाले की, भारतीय मुलांना बुध्दीमत्तेवर परदेशामध्ये चांगल्या प्रकारच्या संधी मिळतात. म्हणून युरोपियन देशांची प्रगती होत आहे. तेथील नावारूपाला आलेल्या अनेक संस्थांमध्ये भारतीयांच्या मार्गदर्शनाखाली काम केले जाते. या तरूण बुध्दीजीवींना आपल्या देशातच चांगल्या संधी उपलब्ध झाल्या व औद्योगिक आणि शैक्षणिक संस्थांनी एकत्रित काम केले तर त्यांच्या अनुभवाचा उपयोग भारताच्या सर्वांगीण विकासासाठी होऊ शकतो, असे डॉ. रंजन यांनी सांगितले.

डॉ. संदीप पाचपांडे यांनी शैक्षणिक संस्थांना येणा-या अडचणींबाबत विचार मांडले. नवीन अभ्यासकम सुरू करताना तज्ज्ञ प्राध्यापकांची कमतरता भासते. अशा समस्यांवर मात करण्यासाठी संस्थाचालकांनी एकत्र येऊन त्यावर मार्ग शोधला पाहिजे, अशी अपेक्षा डॉ. पाचपांडे यांनी व्यक्‍त केली.
यावेळी डॉ. ई. बी. खेडकर, डॉ. संजय चोरडीया यांनीही आपले विचार मांडले. या चर्चासत्रामध्ये पुणे, मुंबई, नागपूर, धूळे, जळगाव, नाशिकसह गुजरात, दिल्ली, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश या राज्यातून आलेले शैक्षणिक संस्थांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.

पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्‍वर लांडगे, उपाध्यक्षा पद्मा भोसले, सचिव व्ही. एस. काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, भाईजान काझी, कार्यकारी संचालक डॉ. गिरीष देसाई, डॉ. डॅनिअल पेनकर, डॉ. किर्ती धारवाडकर, यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. अनुराधा फडणीस, डॉ. स्वप्नाली कुलकर्णी यांनी कार्यकमाचे संयोजन केले. सुत्रसंचालन प्रा. ऐश्वर्या गोपालाकृष्णन, तर रविश रोशन यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.