Chinchwad : कलेवर संशोधन करणे गरजेचे – अदिती हर्डीकर

एमपीसी न्यूज – कलेवर संशोधन करण्याची आजच्या काळाची खूप मोठी गरज आहे. संशोधनातून भारतीय संस्कृतीचे नाव पुढे आणावे. संस्कृती वाढवावी, असे आवाहन अदिती हर्डीकर यांनी कलाकारांना केले. पूर्वी कलेतून नागरिक संघटित होत होते. या संघटनांचे देशाला स्वातंत्र्य मिळण्यात योगदान आहे, असेही त्या म्हणाल्या. 

संस्कार भारती संस्थेशी संलग्न असलेल्या मुक्तांगण संस्थेच्या वतीने आयोजित केलेल्या रांगोळी सराव शिबिराच्या उद्‌घाटन प्रसंगी हर्डीकर बोलत होत्या. चिंचवड, पवनानगरमधील मरळ उद्यानात आज (शनिवारी)झालेल्या कार्यक्रमाला मुक्तांगण संस्थेच्या अध्यक्षा मधुरा कुलकर्णी, कलासंस्था व संस्कार भारतीचे अध्यक्ष अमित गोरखे, नगरसेविका करुणा चिंचवडे, राजेंद्र गावडे, शेखर चिंचवडे, स्वप्नाली काळे, अनिता रोकडे, हर्षद कुलकर्णी आदी उपस्थित होते.

गोरखे म्हणाले, ‘कला टप्प्या-टप्प्याने वाढत आहे. कलावाढीसाठी आज काम करणे गरजेचे असून आजकाम केल्यास उद्या आपोआप कला वाढणार आहे’.

मुक्तांगण संस्था रांगोळीचा प्रसार आणि प्रचार करते. या संस्थेतर्फे रांगोळीच्या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. गणपती बाप्पांच्या मिरवणुकीत रांगोळीच्या ‘पायघड्या’ घातल्या जातात. त्याची रांगोळी काढण्याचे प्रशिक्षण तीन महिने देण्यात येणार आहे. दर शनिवारी आणि रविवारी सकाळी दोन तास चिंचवड, पवनानगरमधील मरळ उद्यानात हे शिबिर होणार असून या शिबिराचा जास्तीत-जास्त नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले.

कार्यक्रमाची माहिती व सूत्रसंचालन हर्षद कुलकर्णी यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.