Pune : संकटकाळातून बाहेर पडण्यासाठी ‘बियॉन्ड द बॉक्स’ विचाराची गरज – अनंत काळवीट

Pune : Need to think 'beyond the box' to get out of the crisis -Anant Kalvitलॉकडाऊनमुळे निर्माण झालेली अनिश्चितता दूर करण्यासाठी चौकटीबाहेरचा विचार करून नव्या संधी हेरायला हव्यात

एमपीसी न्यूज – कोणत्याही क्षेत्रात यशस्वी व्हायचे असेल, तर चौकटी बाहेरचा विचार करणे गरजेचे असते. कोरोनाच्या संकट काळातून बाहेर पडण्यासाठी अशाच ‘बियॉन्ड द बॉक्स’ विचाराची आज गरज आहे. कोरोना, लॉकडाऊनमुळे निर्माण झालेली अनिश्चितता दूर करण्यासाठी चौकटीबाहेरचा विचार करून नव्या संधी हेरायला हव्यात, असे मत ZF गिअरिंग सर्व्हिसेसचे अध्यक्ष अनंत काळवीट यांनी व्यक्त केले आहे.

 

उद्योजिका, तंत्र सल्लागार व लेखिका धनश्री जोग यांच्या ‘होरायझन’ या कथासंग्रहाचे आणि ‘बियॉन्ड द बॉक्स’ या तंत्रविषयक पुस्तकाचे प्रकाशन अनंत काळवीट व माजी आमदार मेधा कुलकर्णी यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाचे प्रसारण फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून करण्यात आले.विविध संस्था आणि व्यक्तींचे अनुभव, आयुष्यातील सत्य घटना यावर आधारित केलेले मानवतेचे वर्णन ही ‘होरायझन’ या पुस्तकाची मध्यवर्ती संकल्पना आहे. तर व्यवसायाची मूल्ये आणि प्रात्यक्षिकावर आधारित तंत्रकौशल्ये सांगणारे ‘बियॉन्ड द बॉक्स’ हे पुस्तक आहे. उद्योगांच्या गुणवत्तावाढीसाठी अनेक मौलिक गोष्टी यात आहेत.

 

अनंत काळवीट म्हणाले, तांत्रिक पुस्तक असले तरी अतिशय ओघवत्या शैलीत धनश्री जोग यांनी मांडले आहे. त्यामुळे सामान्य माणसालाही कळेल. उद्योगांच्या यशात, विस्तारात आवश्यक तंत्र-कौशल्ये यामध्ये मांडली आहेत. एखाद्या प्रश्नाचे किंवा अडचणीचे उपाय शोधण्यासाठी चौकटीतला विचार करण्यापेक्षा त्याबाहेर जाऊन उपाययोजना कशा कराव्यात, यासाठी हे पुस्तक मार्गदर्शनपर असल्याचे काळवीट म्हणाले.

 

होरायझन या पुस्तकाबद्दल बोलताना मेधा कुलकर्णी म्हणाल्या, गोष्टीच्या रूपातून भावनिक आंदोलने मांडण्याचा प्रयत्न ‘होरायझन’ मधून केलेला आहे. त्यामुळे पुस्तक वाचताना उत्कंठा वाढत जाते. समाजातल्या विविध घटकांच्या बाबतीत आलेले अनुभव अतिशय आशयपूर्ण मांडले आहे. जीवनात आलेले अनुभव प्रामाणिक व वस्तुनिष्ठपणे उतरवली आहे. पुस्तक वाचताना आपल्या आयुष्यातील घटनांच्या आठवणींना उजाळा मिळतो.

 

प्रास्ताविकात धनश्री जोग यांनी पुस्तकांच्या लेखनाविषयी सांगितले. अनेक वर्षे उद्योजिका, सल्लागार म्हणून काम करताना आलेल्या विविध अनुभवांवर आधारित ही पुस्तके लिहिता आली आणि या दोन्ही पुस्तकांचे तज्ज्ञांकडूनही चांगले स्वागत होत आहे, याचा आनंद वाटतो. मंजुषा वैद्य, अमेय जोग यांनी सूत्रसंचालन केले. धनश्री जोग यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.