NEET JEE Exam : ग्लोव्हज व मास्क घालून परीक्षा कशी द्यायची; शिक्षणमंत्र्यांनी 20 मिनिट ग्लोव्हज घालून दाखवावे

नीट आणि जेईई परिक्षेबाबत सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला असून कोरोना संकटात जेईईची परीक्षा 1 ते 6 सप्टेंबर व नीटची परीक्षा 13 सप्टेंबर रोजी होणार आहे.

एमपीसी न्यूज – एकतर सरकार विद्यार्थ्यांचे काही ऐकत नाही, त्यात तुम्ही नीट आणि जेईई परीक्षा घ्यायचे ठरवले. नियमानुसार मास्क आणि हॅन्ड ग्लोव्हज घालून विद्यार्थ्यांना परीक्षा द्यावी लागणार आहे. पण तोंडाला मास्क आणि हातात ग्लोज घालून परीक्षा कशी द्यायची, असा प्रश्न स्वाती त्रिपाठी या विद्यार्थिनीने शिक्षणमंत्र्यांना विचारला आहे. तसेच, शिक्षणमंत्र्यांनी 20 मिनिट ग्लोव्हज घालून दाखवावे, असं चॅलेंज देखील तिने केले आहे.

नीट आणि जेईई परिक्षेबाबत सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला असून कोरोना संकटात जेईईची परीक्षा 1 ते 6 सप्टेंबर व नीटची परीक्षा 13 सप्टेंबर रोजी होणार आहे.

या निर्णयाविरोधात आता सर्व विरोधी पक्ष एकवटले असून या परीक्षांबाबत आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित केला जात आहे.

अशात नीट परीक्षा इच्छुक असणा-या एका विद्यार्थिनीने थेट शिक्षण मंत्र्यांना चॅलेंज करत मास्क आणि ग्लोव्हज घालून परीक्षा कशी द्यायची असा सवाल केला आहे.

स्वाती त्रिपाठी असे या विद्यार्थिनीचे नाव असून तिचा सध्या एक व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये तिने म्हटले आहे की, मी नीट परीक्षेसाठी सरकारने जाहीर केलेली नियमावली पाहत असताना त्यात आम्हाला मास्क आणि ग्लोव्हज घालून पेपर लिहावा लागणार आहे.

एक तर सरकार आमची कसलीही मदत करत नाही. काही ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. प्रवासाची कोणतीही व्यवस्था नाही तरी काहीही करून संकटे बाजूला करत आम्ही परीक्षा केंद्रावर पोहोचू.

पण, त्यानंतर आम्ही मास्क आणि ग्लोव्हज घालून परीक्षा कशी द्यायची? या परिस्थितीत आम्ही पेपर कसा सोडवायचा, असा प्रश्न तिने उपस्थित केला आहे.

डॉक्टर सोडून इतर कोणीही वीस मिनिट हे ग्लोव्हज घालून दाखवावेत. अगदी शिक्षण मंत्री आणि ज्यांना या परीक्षा वेळेत व्हाव्यात, असं वाटते त्यांनीसुद्धा हे ग्लोव्हज घालून दाखवावेत.

मी पाच मिनिटासाठी ग्लोव्हज घातलेत तर हाताला पूर्ण घाम फुटला आहे‌, अशा परिस्थितीत आम्ही पेपर कसा सोडवायचा. फिजिक्स, केमिस्ट्री, गणित या विषयाचे प्रश्न कसे सोडवायचे, असा सवाल तीने उपस्थित केला आहे.

सरकारला या गोष्टी समजत नाहीत का ? कित्येक विद्यार्थी परिक्षेच्या चिंतेत आत्महत्या करताहेत. आत्महत्या हा पर्याय नसला तरी सरकारने याच्यावर पर्याय शोधून काढला पाहिजे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी डिसेंबर ते जानेवारीपर्यंत कोरोनावर लस येईल असे म्हणत आहेत. त्यामुळे दोन महिने थांबण्यास काय हरकत आहे.

पण, काही कोचिंग माफियांच्या दबावाखाली येऊन ही परीक्षा घेतली जात आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा विचार करून या परीक्षेबाबत योग्य निर्णय घ्यावा, असे या विद्यार्थिनीने म्हटले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.