Talegaon Dabhade : दुकानाचे शटर उघडे ठेवण्याचा निष्काळजीपणा नडला ! 27 लाख रुपयांच्या दागिन्यांची चोरी

तळेगाव बाजारपेठेतील संघवी ज्वेलर्समधील प्रकार

एमपीसी न्यूज- तळेगाव बाजारपेठेतील संघवी ज्वेलर्समधून अज्ञात चोरट्यांनी 27 लाख रुपयांचे दागिने व रोख रक्कम चोरल्याची घटना सोमवारी (दि. ३०) सकाळी घडली. या घटनेमुळे बाजारपेठेत एकच खळबळ उडाली आहे. सीसीटीव्ही फुटेजमधून चोरटा कैद झाला असून तपासाच्या कामासाठी अनेक ठिकाणी पोलीस पथके रवाना झाली आहे.

याबाबतची फिर्याद येथील सोन्या चांदीचे दागिन्याचे व्यापारी अशोक जव्हेरचंद ओसवाल (वय 56 रा. 982 बुधवार पेठ, तेली आळी, तळेगाव दाभाडे) यांनी दिली आहे.

तळेगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मारुती मंदिर चौकाजवळील मुख्य बाजारपेठेत संघवी ज्वेलर्स दुकान आहे. सोमवारी (दि. 30) सकाळी रोजी सव्वासहाच्या सुमारास फिर्यादी ओसवाल हे गुरुदर्शनासाठी मुंबईला गेले. जाताना दुकानाचे शटर अर्धवट उघडले व सुनबाईस आवाज देऊन ते बंद करावयास सांगितले. सकाळी नातीची शाळा असल्याने सुनबाई मुलीची शाळेत जाण्याची तयारी करत असल्याने दुकान बंद करण्याचे राहून गेले. मुलीची रिक्षा येईल म्हणून सुनबाई सकाळी 7 वाजता खाली दुकानात तिला शाळेत सोडण्यासाठी आल्या. तोपर्यंत अज्ञात चोरट्यांनी 1 लाख 35 हजार रुपयाचे चांदीचे दागिने, 25 लाख 70 हजार 400 रुपये किमतीच्या सोन्याच्या बांगड्या, 6 हजार रुपये किमतीच्या 1 ग्राम टेम्पर ज्वेलरी 2 नग, 2 हजार 900 रुपये किमतीचे गंजात लक्ष्मीचे दोन नग, 10 हजार रुपये रोख रक्कम, तसेच 10 हजार रुपयांचे लॅपटाॅप असा एकूण 27 लाख 34 हजार 300 रुपयाचा ऐवज चोरट्याने लंपास केला.

याबाबत दिवसभरामध्ये ठसे तज्ञ, श्वान पथक यांनी घटनास्थळी तपास केला आहे. तसेच पोलिसांनी अनेक ठिकाणी तपासासाठी पथके रवाना केली आहेत. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप गाडीलकर व सहकारी करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.