Nepotism in Bollywood: ‘स्टारकिड’ला अपयशाचा आमच्याइतका सामना करावा लागत नाही- हिना खान

Nepotism in Bollywood: 'Starkid' doesn't have to face failure as much as us - Heena Khan

एमपीसी न्यूज – सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधील घराणेशाहीवर बरीच टीका झाली. अनेकांनी येथे प्रस्थापितांकडून कसा त्रास दिला जातो याविषयी मोकळेपणाने आपली मते मांडली. याच विषयी‘बिग बॉस’ फेम हिना खानने आपले मत व्यक्त केले आहे.

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री असणा-या  हिनाने मादक अदा आणि उत्तम अभिनय यांच्या जोरावर प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर तिने घराणेशाहीवर भाष्य केलं आहे. एका मुलाखतीत ती बोलत होती.

‘प्रत्येकाच्या आयुष्यातील करिअरचा संघर्ष वेगवेगळा असतो. काहींच्या वाट्याला अनेक चढ-उतार येतात. तर काहींना प्रत्येक गोष्ट सहज मिळते. या सगळ्यामागे अनेक कारणं आहेत. तुम्हालाच संधी मिळेल हे दरवेळी गरजेचं नाही. काही वेळा तुम्हाला संधी मिळते, मात्र तुम्ही स्वत: ला १०० टक्के सिद्ध करण्यासाठी कमी पडता. असं बऱ्याच वेळा घडतं. तुम्ही फार उत्तम कलाकार आहात, मात्र तुमच्याकडे एक खास विशेषाधिकार नसतो. त्यामुळे इतरांना मिळतात अशा संधी तुम्हाला मिळत नाही’.

‘हा सगळ्या संघर्षाचा भाग आहे. जर माझ्याविषयी सांगायचं झालं तर मी छोट्या पडद्यापासून करिअरची सुरुवात केली. मी चित्रपट, वेबसीरिज केले. लघुपटात काम केलं. म्युझिक व्हिडीओमध्येही काम केलं आणि आता डिजिटल प्लॅटफॉर्मवर काम करतेय. मी १० चित्रपट किंवा काही म्युझिक अल्बममध्ये काम केलं तरीसुद्धा प्रत्येकवेळी माझा अभिनय उत्तम असला पाहिजे याकडे माझं लक्ष असतं. जर मी चांगलं काम केलं तरच लोकांचं लक्ष माझ्याकडे जाणार आहे. एखाद्या दिग्दर्शक किंवा निर्मात्याला आपला अभिनय आवडावा यासाठी आम्हाला फार मेहनत करावी लागते’, असं हिना म्हणाली.

पुढे ती म्हणते, ‘सध्या घराणेशाहीचा मुद्दा सुरु आहे, त्यावर मलाच एकच सांगावसं वाटतं. जे स्टारकिड्स असतात किंवा ज्यांचा कलाविश्वात सतत वावर असतो, त्यांना या क्षेत्रात विशेष महत्त्व असतं. त्यांच्याकडे १० चित्रपट असतील आणि त्यातील एखादा बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला तर त्यांना फरक पडत नाही. पण जर मी एखादा मोठा चित्रपट केला आणि तो अपयशी ठरला तर मला परत नवीन संधी मिळणार नाही. हाच एक फरक आहे. त्यांचा चित्रपट यशस्वी ठरो न ठरो त्यांच्याकडे नवीन चित्रपट तयार असतो. कोणीच जन्मत: हुशार नसतं. स्टारकिडचे पहिले चित्रपट पाहा आणि आताचे पाहा,  फार फरक जाणवतो. हाच फरक माझ्याबाबतीतही लागू आहे’.

हीनाने व्यक्त केलेल्या या मतांवरुन चित्रपटक्षेत्रात आणखी एक वादळ येऊ शकते. कारण तिची ही मते खूपच रोखठोक आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.