Nepotism In Marathi Film Industry : मराठी चित्रपटसृष्टीत देखील घराणेशाही असल्याचा महेश टिळेकर यांचा खळबळजनक दावा

Nepotism In Marathi Film Industry: Mahesh Tillekar's sensational claim that there is dynasticism in Marathi film industry too यूट्यूब आणि फेसबुकवर व्हिडीओ पोस्ट करीत निर्माते-दिग्दर्शक महेश टिळेकर यांनी या विषयावर परखड मते मांडली आहेत.

एमपीसी न्यूज – बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत यांच्या आत्महत्येनंतर अनेक धक्कादायक गोष्टी पुढे आल्या आहेत. त्यातील एक मुख्य म्हणजे घराणेशाही ही आहे. याविरोधात कंगना राणावत, रवीना टंडन, प्रकाश राज, अभिनव कश्यप यांसारख्या कलाकारांनी आवाज उठवला. तर मराठी इंडस्ट्रीतही घराणेशाही आहे, मक्तेदारी चालते. पडद्यामागून ही सूत्रं हलवली जातात, असं धक्कादायक विधान निर्माते दिग्दर्शक महेश टिळेकर यांनी मांडलंय. त्यांनी याविषयी फेसबुकवर व्हिडीओ पोस्ट केला असून त्यात आपले मत मांडले आहे.

‘इंडस्ट्रीत कोणी नवीन आलं असेल, काही चांगलं काम करत असेल, कोणी पुढे जात असेल तर त्याचे पाय खेचण्याचं काम इथेही केलं जातं. एखाद्याची कला चांगली असेल, तो उत्तम अभिनेता असेल आणि अनेक वर्षे काम करत असेल तरी त्याला संपवण्याचा घाट इथलीच काही मंडळी करत असतात. ही मंडळी स्वत:ला अतिशहाणे समजतात. समोरुन हे वार करत नाहीत, तर पडद्यामागून ही सूत्रं हलवली जातात’, अशी टीका त्यांनी केली आहे.

ते पुढे म्हणाले, ‘मला अनेकांनी आव्हान दिलं होतं की तुला इंडस्ट्रीतून काढून टाकेन. मी माझ्या जिद्दीने टिकून आहे. ही लोकं मानसिक खच्चीकरण करतात. माझ्या चित्रपटांवरून अफवा उठवल्या गेल्या. मी असे अनेक राजकीय डाव हाणून पाडले आहेत. शेतकरी कुटुंबातून मी इथंवर आलो. गॉडफादर नसतानाही पाय रोवून उभा आहे. ‘मराठी तारका’ या कार्यक्रमाचं कोणीच कधी कौतुक केलं नाही. चित्रपट प्रदर्शनापूर्वी ही लोकं अनाथाश्रमात जातात, खोटंखोटं रडतात आणि त्यांची प्रसिद्धी केली जाते. पण प्रामाणिकपणे काम केलेल्यांचं कौतुक केलं जात नाही’.

‘इंडस्ट्रीत फक्त २० टक्के लोकं चांगली आहेत. बाकी सगळी ग्रुपमध्ये वावरणारी आहेत. नको त्या चित्रपटांना पुरस्कार दिले जातात, त्यांचा उदोउदो केलं जातं. यांचे दाखवायचे दात वेगळे, खायचे दात वेगळे. नवीन आलेल्या कलाकारांना पाण्यात बघितले जातात. जसं हिंदीत चालतं तसंच इथेही चालतं. मैत्रीचं वातावरण फक्त दाखवण्यापुरतं आहे’, अशी टीका त्यांनी केली.

इंडस्ट्रीबाहेरील सामान्य कुटुंबातून आलेले टिळेकर यांनी अगदी स्पॉटबॉयपासून काम केले आहे. नंतर चित्रपटात छोटे मोठे रोल केले. पुढील काळात त्यांनी चित्रपट दिग्दर्शित देखील केले. त्यांच्या ‘मराठी तारका’ या कार्यक्रमाने प्रचंड लोकप्रियता मिळवली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.