Nepotism in Music Industry: सोनू निगमची संगीत क्षेत्रातील घराणेशाहीबद्दल टीका

Nepotism in Music Industry: Sonu Nigam criticized the nepotism in the field of music

एमपीसी न्यूज – सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधील घराणेशाहीविषयी उघडउघड बोलले जाऊ लागले. याआधी ते कुजबुजत्या स्वरात बोलले जात असे. कारण त्यामुळे आपल्याला इथे काम मिळाले नाही तर काय करायचे अशी प्रत्येकाला भीती वाटत असे. पण आता याविषयी खुल्लमखुल्ला बोलले जात आहे.

गायक सोनू निगमने देखील संगीतक्षेत्रात घराणेशाही असल्याचा आरोप केला होता. त्यावेळी त्याने कोणाची नावं घेतली नव्हती. मात्र नुकत्याच पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये त्याने गायक अरमान मलिक, अमाल मलिक, निर्माते भूषण कुमार यांच्यावर टीका केली आहे.

‘तू चुकीच्या माणसाशी पंगा घेतलास. पुन्हा माझ्या नादी लागलास तर मरीना कंवरचा व्हिडीओ माझ्या युट्यूब चॅनलवर पब्लिश करेन’, असा थेट इशारा प्रसिद्ध गायक सोनू निगमने टी-सीरिजच्या भूषण कुमारला दिला आहे. सोनूने त्याच्या फेसबुक अकाऊंटवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे आणि यावेळी त्याने संगीत क्षेत्रातील काही व्यक्तींची थेट नावं घेत पोलखोल केली आहे.

‘लातों के भूत बातों से नहीं मानते. प्रामाणिकपणाची भाषा सर्वांना समजत नाही. मी खूप चांगल्या पद्धतीने बोललो होतो, की तुम्ही नवीन कलाकारांसोबत प्रेमाने वागा. कारण आत्महत्या झाल्यानंतर विचार करण्यापेक्षा त्यापूर्वी वातावरण बदललेलं केव्हाही चांगलं’.

‘पण जे माफिया आहेत ते त्याच पद्धतीने वागणार. मी कोणाचंच नाव घेतलं नव्हतं. पण त्यांनी माझ्या विरोधात बोलण्यासाठी पाच-सहा जणांच्या मुलाखती घेतल्या. याच पाच-सहा जणांपैकी एकाच्या भावाने दीड वर्षापूर्वी एक ट्विट केलं होतं. (स्क्रीनवर गायक अरमान मलिकचं ट्विट दिसतं.) जर संगीत क्षेत्रात एकीअसती तर चित्रच वेगळं असतं असं त्याने या ट्विटमध्ये लिहिलं होतं’.

‘भूषण कुमार, आता तर मला तुझं नाव घ्यावंच लागेल. तू चुकीच्या माणसाशी पंगा घेतलास. जेव्हा तू माझ्या घरी येऊन मला विनंती करायचास, ती वेळ विसरलास तू. भावा माझा म्युझिक अल्बम कर, स्मिता ठाकरे यांच्याशी माझी भेट करुन दे, बाळासाहेब ठाकरे, सहारा श्री यांच्याशी भेट करुन दे. अबू सालेमपासून मला वाचव, अशी विनवणी तू माझ्याकडे केली होती. विसरलास का ते दिवस?’

‘आता तू माझ्या नादी लागू नकोस. मरीना कंवर लक्षात आहे ना? ती का बोलली आणि नंतर तिने माघार का घेतली हे मला नाही माहित. हे माध्यमांना माहित आहे. तिचा व्हिडीओ माझ्याकडे आहे. जर तू माझ्याशी पंगा घेतलास तर तो व्हिडीओ मी माझ्या युट्यूब चॅनलवर पोस्ट करेन आणि धुमधडाक्यात मी लढेन’.

याआधीही व्हिडीओ पोस्ट करत सोनू म्हणाला होता, ‘अभिनय क्षेत्रात घराणेशाही तर आहेच, परंतु ही परंपरा आता संगीताच्या दुनियेतही सुरु झाली आहे. दिग्दर्शक, निर्माता तयार असतानाही अनेक नव्या कलाकारांना संगीत कंपन्यांच्या मक्तेदारीमुळे काम मिळत नाही. हा प्रकार त्वरित थांबवा अन्यथा आता संगीत क्षेत्रातही आत्महत्या सुरु होतील अशी भीती मला वाटतेय’.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.