Neral : नारायण सुर्वे हे जगण्यातून समृद्ध झालेले कवी – नागनाथ कोतापल्ले

एमपीसी न्यूज- आपल्या कवितेतील शब्द लोकांना रुचतात की नाही याचा विचार न करता फक्त स्वतःचे शब्द बोलणाऱ्या कवींमध्ये नारायण सुर्वे यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. जोपर्यंय मराठी भाषा बोलली जाईल तोपर्यंत नारायण सुर्वे यांच्या कविता आपण बोलत राहू असे गौरवोद्गार सुप्रसिद्ध साहित्यिक आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष नागनाथ कोतापल्ले यांनी काढले. कामगार दिनानिमित्त पद्मश्री नारायण सुर्वे कला अकादमीच्या वतीने नेरळ (जि. रायगड) येथे काव्यजागर संमेलनाच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे मुख्य समन्वयक सचिन इटकर होते. यावेळी नारायण सुर्वे साहित्य कला अकादमीचे अध्यक्ष सुदाम भोरे, मराठी साहित्य परिषदे भोसरीचे अध्यक्ष मुरलीधर साठे, पत्रकार अनिल कातळे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी टाटा मोटर्सचे मनोहर परळकर यांना नारायण सुर्वे जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. नारायण सुर्वे काव्यप्रतिभा पुरस्कार कवी भारत दौंडकर यांना तर नारायण सुर्वे काव्य पुरस्कार नितीन देशमुख, कविता मोरवणकर आणि मंगेश विश्वासराव यांना देण्यात आला.

नागनाथ कोतापल्ले पुढे म्हणाले, " कवी नारायण सुर्वे हे जगण्यामधून समृद्ध झालेले कवी होते. ते विविध भूमिकांमधून जगले, कामगार म्हणून जगले, पुढे शिक्षक झाले. हे जगणे म्हणजेच त्यांचे विद्यापीठ होते. नारायण सुर्वे लोकप्रिय झाले. लोकप्रिय माणसाला शब्द बदलण्याचे जीवनामध्ये तडजोड करण्याचा किंवा लोकानुनय करण्याचा मोह होतो. पण नारायण सुर्वे यांना आपली कविता सादर करताना कोणत्याही प्रकारचे मोह झाले नाहीत, त्यांनी कधीही तडजोड केली नाही. एखादा कवी कसा आहे यावर त्याची कविता मोठी किंवा छोटी होते असे सांगताना कोतापल्ले म्हणले की, दोन प्रकारचे कवी असतात एक कवी दुसऱ्यांचे शब्द बोलतो तर दुसरा स्वतःचे शब्द बोलतो. मग ते शब्द कुणाला रुचणार की नाही याचा तो विचार करीत नाही. असे कवी फार थोडे असतात. अशा कवींमध्ये नारायण सुर्वे यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल.

यावेळी सचिन इटकर, मुरलीधर साठे, अनिल कातळे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक सुदाम भोरे यांनी केले तर आभार रोहित खर्गे यांनी मानले.

पुरस्कार वितरण कार्यक्रमानंतर रंगलेल्या काव्य मैफिलीत ऍड शिल्पा सावंत, चंद्रकांत वानखेडे, सविता इंगळे, बबन सरोदे, वृषाली विनायक, अनिल दीक्षित, अरुण पवार, अंकुश आरेकर आदी कवींनी विविध विषयांवर सादर करुन काव्य रसिकांची वाहवा मिळविली. काव्यमैफिलीच्या अध्यक्षस्थानी उद्धव कानडे होते तर काव्यमैफिलींचे सूत्रसंचालन भारत दौंडकर यांनी केले.

कार्यक्रमाचे संयोजन सुदाम भोरे, कल्पना घारे यांनी केले तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गणेश घारे, पुरुषोत्तम सदाफुले, जयवंत भोसले, हनुमंत देशमुख, राजेंद्र वाघ यांनी परिश्रम घेतले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.